scorecardresearch

वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त ; पालघर शहरात अतिक्रमणांवर नियंत्रण ठेवण्याची नागरिकांची नगर परिषदेकडून अपेक्षा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पोलीस यंत्रणा कार्यरत नसल्यास मोठय़ा लांबीच्या रांगा सर्व दिशेने लागताना दिसतात

traffic jams in palghar
पालघर शहरात दुपार व सायंकाळच्या वेळी तुफान वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

पालघर : पालघर येथील वाहतूक सुलभतेसाठी व नियंत्रणासाठी महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून प्रमुख चौकांमध्ये वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. असे असताना देखील पालघर शहरात दुपार व सायंकाळच्या वेळी तुफान वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

पालघर रेल्वे स्थानकाच्या परिसरात अनधिकृत रिक्षा स्टॅन्ड उभारण्यात आले असून अशा स्टॅन्डमध्ये रिक्षांच्या दोन रांगा असतात. एखादे मोठे वाहन वा राज्य परिवहन मंडळाची बस एका बाजूने आल्यास किंवा स्थानकात रेल्वेगाडी आल्यास या परिसरात भयंकर वाहतूक कोंडी होताना दिसून येते.

छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. मात्र वेगवेगळय़ा वेळी वाहनांची संख्या बदलत असल्याने समान वेळेच्या आधाराने आखण्यात आलेली सिग्नल यंत्रणा कार्यक्षम पद्धतीने सुरू राहत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या चौकात शाळा, महाविद्यालय तसेच औद्योगिक आस्थापने सुटण्याच्या वेळेत मोठय़ा प्रमाणात गर्दी होताना दिसून येते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पोलीस यंत्रणा कार्यरत नसल्यास मोठय़ा लांबीच्या रांगा सर्व दिशेने लागताना दिसतात. रस्त्याचे रुंदीकरण काम रेंगाळले असून चौकाच्या अवतीभवती झालेले अतिक्रमण तोडण्या सार्वजनिक बांधकाम विभाग अपयशी ठरले आहे. याच भागात अनेक रुग्णालय, शाळा, महाविद्यालय असल्याने पालकांना आपल्या पाल्यांना घेऊन प्रवास करणे त्रासदायक होत असून या भागात नेहमीच लहान-मोठे अपघात घडत असतात.

स्टेट बँकेच्या परिसरात देखील वाहतूक नियंत्रणात ठेवण्यास पोलिसांची तारेवरची कसरत करावी लागत असून लगतच्या भागात उभी करण्यात येणारी वाहने वाहतूक कोंडीस जबाबदार ठरत आहेत. पालघरमधील वाहतूक समस्या संदर्भात पोलिसांनी सर्व घटकांची बैठक घेऊन संबंधिताला समज द्यावी तसेच नगर परिषदेने व सार्वजनिक बांधकाम विभागाने मुख्य रस्त्यालगत होणाऱ्या अतिक्रमणावर नियंत्रण ठेवावे अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Citizens suffer from traffic jams in palghar zws