पालघर : पालघर जिल्ह्याच्या रेल्वे सेवेत सुधारणा करण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन सादर केले. यामध्ये जिल्ह्याच्या नागरिकांच्या, व्यापाऱ्यांच्या, विद्यार्थ्यांच्या आणि औद्योगिक क्षेत्रातील घटकांच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांचा समावेश आहे.

पश्चिम रेल्वेच्या पत्रानुसार, यापूर्वी केलेल्या मागण्यांमधून दोन गाड्यांना थांबा देण्यात आला आहे. या मंजूर झालेल्या थांब्यांमध्ये १२९३५/१२९३६ बांद्रा-सूरत इंटरसिटी आणि २०९४१/२०९४२ बांद्रा-गाझीपूर एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश आहे. उर्वरित दोन गाड्यांसाठीही लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

जनतेच्या भावनांचा आदर करत, २२९०१/२२९०२ बांद्रा-उदयपूर सुपरफास्ट एक्सप्रेस या गाडीचे नाव बदलून “श्री महाराणा प्रताप सुपरफास्ट एक्सप्रेस” असे करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच पालघर रेल्वे स्थानकावर १२९५३/१२९५४ – ऑगस्ट क्रांती तेजस राजधानी, १२९६१/१२९६२ – अवंतिका सुपरफास्ट एक्सप्रेस, २२९०१/२२९०२ – बांद्रा-उदयपूर सुपरफास्ट एक्सप्रेस या लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देण्याची मागणी करण्यात आली आहे, ज्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

याव्यतिरिक्त प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन २०४९५/२०४९६ – जोधपूर-पुणे एक्सप्रेस, १२९८९/१२९९० – दादर-अजमेर एक्सप्रेस, १२९७१/१२९७२ – बांद्रा-भावनगर एक्सप्रेस, २२९४३/२२९४४ – दौंड-इंदूर एक्सप्रेस या गाड्यांनाही पालघर स्थानकावर थांबा देण्याची विनंती करण्यात आली आहे. बोईसर रोड स्थानकाशी संबंधित नऊ ग्रामपंचायती २०१७ पासून ही मागणी करत आहेत, मात्र अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. या मागण्या पूर्ण झाल्यास शिक्षण, व्यवसाय आणि दळणवळण क्षेत्रात जिल्ह्यात मोठा सकारात्मक बदल घडेल, असे खासदार डॉ. सवरा यांनी नमूद केले.

बोईसर आणि वसई रोड स्थानकांसाठी विशेष मागण्या

बोईसर आणि वसई रोड स्थानकांवर अधिक गाड्यांना थांबा मिळावा, पालघर-डहाणू रोड मेमू सेवा वाढवून ती बोर्डी – अमरसाड – नवापूर पर्यंत विस्तारीत करावी, फ्लाइंग राणी एक्सप्रेसला उमरसाडी येथे थांबा देण्यात यावा, वसई-डहाणू मेमू सेवा बोईसर, उमरसाडी पर्यंत वाढवण्याची विनंती करण्यात अली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालघर जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी, कामगार, व्यावसायिक आणि सर्वसामान्य प्रवाशांना सुलभ, वेगवान आणि सुरक्षित रेल्वे सेवा मिळणे ही त्यांची प्राथमिकता आहे. मंजूर झालेल्या थांब्यांमुळे जनतेच्या दैनंदिन प्रवासातील अडचणी निश्चितच कमी होतील. ही केवळ सुरुवात आहे. उर्वरित मागण्या मान्य होईपर्यंत मी दिलेल्या वचनाप्रमाणे सातत्याने पाठपुरावा करत राहीन आणि पालघर जिल्ह्याच्या सर्वांगीण रेल्वे विकासासाठी कटिबद्ध राहीन. – डॉ. हेमंत सवरा, खासदार