एसटीच्या पालघर विभागाचे १४ कोटींचे नुकसान

पालघर: एस.टी.कर्मचारी कृती समितीतर्फे पालघर विभागातील पदाधिकारी व कामगारांनी बुधवारी पुकारलेला संप गुरुवारी मागे घेण्यात आले. मात्र कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे प्रवाशांचे हाल झाले होते. संपकत्र्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी पालघर विभागातील बस गाड्या बाहेर येऊ न दिल्याने प्रवाशांना इच्छीतस्थळी जाता आले नाही.  पालघर विभागाचे सुमारे १४ कोटीं रुपयांचे नुकसान झाल्याचे  सूत्रांकडून सांगण्यात येते.

महाराष्ट्र एस.टी.कामगार संघटनेतर्फे बुधवारपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता मिळावा, सण उचल १२ हजार ५०० रुपये मिळावेत, वार्षिक वेतनवाढीचा दर तीन टक्के असावा, दिवाळी भेट म्हणून १५ हजार रुपयांचा निधी मिळावा अशा प्रमुख मागण्यांकरिता विभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण  सुरू केले होते. एस.टी. कर्मचाऱ्यांनी गुरुवारी पहाटेपासून आंदोलन तीव्र करून संप पुकारला. पालघर विभागातील पालघर, बोईसर, वसई, नालासोपारा, अर्नाळा, डहाणू या आगारामधील एस.टी. बसगाड्या रोखून धरल्या होत्या.

वसई, नालासोपारा  एस.टी. आगारामधील सर्व कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग घेतला होता.    सकाळपासून कामबंद पुकारल्याने एकही एसटी ही आगारातून बाहेर पडली नव्हती.

राज्य शासनात विलीनीकरण करण्याची मागणी आम्ही अनेकदा केली आहे. परंतु ते होत नसल्याने एसटीला टोल कर, इंधन खर्च, प्रवासी कर अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा सर्व अडचणीत कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार तरी कसा? अनेक वर्षांपासून आजही एसटी कर्मचारी तुटपुंज्या पगारावर काम करतात. वाढत्या महागाईच्या काळात घरखर्च व इतर खर्च कसा भागणार असा प्रश्न कर्मचारी दिनेश कातकडे यांनी उपस्थित केला होता.  शासनाने आमच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून यावर लवकर तोडगा काढावा अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली होती.  यावर तोडगा निघाला नाही तर आंदोलनाचे स्वरूप अधिक तीव्र होईल, असा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला होता.

दरम्यान, ऐन दिवाळीच्या तोंडावर मागील दोन दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचा पवित्रा घेतल्याने  एसटीची वाहतूक सेवा ठप्प झाली होती. यामुळेविविध ठिकाणच्या भागात एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती. विशेष करून ग्रामीण भाग व लांब पल्याच्या ठिकाणी  ये-जा करणारे नागरिक एसटीचा अधिक वापर करतात. त्यामुळे एसटी सेवा बंदचा  प्रवाशांना मोठा फटका बसला होता.

४६२ फेऱ्या रद्द

 पालघर विभागातील २३२३ कर्मचाऱ्यांपैकी अधिक तर कर्मचारी संपावर राहिल्याने सुमारे ९० टक्के सेवा प्रभावित राहिल्या होत्या. पालघर विभागातील ५२७ पैकी ४६२ फेऱ्या रद्द झाले असून राज्य परिवहन मंडळाचे सुमारे १४ कोटी ६० लाख रुपयांची नुकसान या संपामुळे झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.