एका दिवसात ५६ नवे रुग्ण

पालघर :  पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात  करोना रुग्ण संख्येने अचानकपण उसळी घेतली आहे. रविवारी एका दिवसात ५३ नवे रुग्णांची नोंद झाली आहे.  या अनुषंगाने जिल्ह्यात सर्वत्र सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून त्या दृष्टीने आरोग्य विभागाला खबरदारीच्या उपाययोजना राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या महिन्याभरात दररोज सरासरी पाच ते पंधरा नवीन रुग्णांची नोंद होत होती. मात्र १९ डिसेंबर रोजी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तब्बल ५३ नवीन रुग्णांची नोंद झाली असून डिसेंबर महिन्यात करोना संसर्ग झालेल्या ग्रामीण भागातील नागरिकांची संख्या १२७ वर पोहोचली आहे.

जिल्ह्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या २१० इतकी असून १९ डिसेंबर रोजी वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात वाढलेल्या २१ नवीन रुग्णांसह डिसेंबर महिन्यात करोना संसर्ग झालेल्या नागरिकांची संख्या २४७ वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे महानगरपालिका क्षेत्रात आठ रुग्णांचा मृत्यू डिसेंबर महिन्यात झाला आहे.

राज्य सरकारने सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला असून जिल्ह्यातील लसीकरण वाढवण्यासाठी विशेष लक्ष देण्याचे जिल्हा प्रशासनाने आरोग्य यंत्राला सूचित केले आहे.  त्याचबरोबरीने करोनासंदर्भातील संकेतांचे व सूचनांचे योग्य पद्धतीने पालन व्हावे तसेच संसर्ग झालेल्यांच्या  संपर्कातील नागरिकांचे तपासणी करण्याचे जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागाला सूचित केले आहे. याचबरोबर आजाराची लक्षणे असणाऱ्यांची तपासणी वाढवावी व आठवडाअखेरीस येणाऱ्या नाताळ सणाच्या अनुषंगाने नागरिकांनी अधिक दक्ष राहण्याचे जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे.