पालघर : पालघर जिल्हयातील रोजगार हमी योजनेच्या कामावर काम केलेल्या अकुशल मजुरांच्या प्रलंबित रकमेतील अडीच कोटीपेक्षा जास्त रक्कम मजुरांच्या थेट बँक खात्यात जमा झालेली आहे. त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. आणखीन काही रक्कम प्रलंबित असली तरी लवकरच ती मजुरांच्या बँक खात्यात जमा होणार आहे, असे रोजगार हमी योजनेच्या विभागाने म्हटले आहे.
रोजगार हमी योजनेंतर्गत एक लाखाहून अधिक मजूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांत सुरू असलेल्या कामावर काम करत आहेत. पालघर जिल्हा स्थापन झाला त्या वेळी रोजगार हमी योजनेंतर्गत मिळणारी मजुरी आणि इतर कारणांमुळे कामावर येण्यास मजूर उदासीन होते. अलीकडील काळात मजुरी वाढली तसेच स्थानिक स्तरावर काम उपलब्ध होत असल्यामुळे कामांवर मजूर येण्याचा ओढा वाढला आहे. याचबरोबरीने कामांवर मध्यान्ह भोजन सुरू केल्यामुळे मजुरांची संख्या आणखीन वाढत आहे
मोखाडा, जव्हार, विक्रमगड येथे योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी विशेष भर दिला जात आहे. मजुरांना दुपारचे जेवण देण्यासाठी जेव्हा येथे सामुदायिक व केंद्रीय स्वयंपाकघर तयार केले जाणार असल्याची माहिती योजनेचे उपजिल्हाधिकारी सुरेंद्र नवले यांनी दिली आहे
मजुरी प्रदान करण्याचे प्रमाण ८८.७४ टक्के
ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यात २०२१-२२ या आर्थिक वर्षांत २३.६९ लाख मनुष्य दिन निर्मितीचे उद्दिष्ट होते. त्यात ३१ मार्च २०२२ अखेपर्यंत ६६.८० लाख इतके उद्दिष्ट साध्य झाले आहे. या वर्षांत १५८ कोटी ६९ लाख ७३ हजार इतकी मजुरी मजुरांना प्रदान करण्यात आली. त्यांची मजुरी खात्यावर आठ दिवसांच्या आत प्रदान करण्याचे जिल्ह्याचे प्रमाण ८८.७४ टक्के आहे. मंगळवापर्यंत पालघर जिल्ह्यात एक हजार १३६ कामांवर नव्वद हजार २६७ इतके मजूर उपस्थित होते. सर्वाधिक मजूर उपस्थितीत पालघर जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. पालघर जिल्ह्यात एकूण २ लाख ३५ हजार ७३७ जॉबकार्डधारक आहेत. आतापर्यंत ८३ हजार ७६८ कुटुंबातील १ लाख ८६ हजार ६५८ मजुरांना कामे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.
योजनेत मध्यान्ह भोजनाचा समावेश आहे. चांगले काम व मजुरी प्राप्त होत असल्यामुळे स्थलांतराचा विषय सुटण्यास मदत होईल. कुपोषण निर्मूलनासाठीही याचा मोठा फायदा होणार आहे. योजनेचा लाभ घेऊन सक्षमीकरणाच्या दृष्टीने वाटचाल करावी असे आवाहन आहे.
-सुरेंद्र नवले, उपजिल्हाधिकारी, रोजगार हमी योजना, पालघर
संग्रहित लेख, दिनांक 13th Apr 2022 रोजी प्रकाशित
रोहयोंतर्गत अडीच कोटी मजुरांच्या खात्यात जमा; मजुरांना दिलासा
पालघर जिल्हयातील रोजगार हमी योजनेच्या कामावर काम केलेल्या अकुशल मजुरांच्या प्रलंबित रकमेतील अडीच कोटीपेक्षा जास्त रक्कम मजुरांच्या थेट बँक खात्यात जमा झालेली आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 13-04-2022 at 02:25 IST
Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Credited account two half crore laborers under rohyo consolation labourers amy