चिंचणीत पोलिसांना मारहाण करण्याचा प्रकार

पालघर : निर्बंध असतानाही  जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी आणि धुडगूस सुरूच आहे.  चिंचणी समुद्रकिनारी मौजमजा करायला आलेल्या मद्यधुंद तरुण पर्यटकांनी पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून धक्काबुकी व मारहाण केल्याचा प्रकार रविवारी संध्याकाळी घडला. या प्रकारानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.

चिंचणी समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेल्या जिल्ह्याबाहेरील मद्यधुंद तरुणांना पोलिसांनी किनारी जाण्यासाठी मज्जाव केला. मात्र मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या तरुणांनी  पोलिसांचे काही न ऐकता त्यांच्या अंगावर वाहन नेण्याचा प्रकार केला. त्यानंतर वाहनातून खाली उतरून  उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचारी यांच्याशी अर्वाच्य भाषेत संभाषण केले व त्यांना धक्काबुक्की केली असे तेथील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यानंतर तेथे उपस्थित काही सागरमित्रांनी पोलीस उपनिरीक्षक यांना पाचारण केले. तरुणांनी त्यांच्याशीही हुज्जत घातली आणि त्यांना मारहाण केली.  त्यानंतर या सर्वांची धरपकड करून त्यांना ताब्यात घेतले गेले. पुढे त्यांच्या आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर वाणगाव पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा तसेच इतर कलमान्वये गुन्हे दाखल केले. क्रिश व जितेंद्र शेनॉय अशी या तरुणांची नावे असून बोईसर पाचमार्ग येथील अनिल ठाकूर यांच्या नावेही गुन्हा दाखल आहे. तिघांना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.