वृक्ष लागवड उपक्रमातील एक कोटी झाडे जिवंत

जिल्ह्यतील वृक्षसंख्येत एक कोटी झाडांची भर पडली आहे.  

नीरज राऊत

पालघर : राज्य सरकारने सन २०१७ ते २०१९ या तीन वर्षांच्या कालावधीमध्ये राज्यात ५० कोटी वृक्ष लागवड करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत जिल्ह्यत लागवड केलेल्या एक कोटी ४२ लाख ४३ हजार  झाडांपैकी सुमारे ७० टक्के रोपे जिवंत असल्याचा दावा वन विभागाने केला आहे.  त्यामुळे जिल्ह्यतील वृक्षसंख्येत एक कोटी झाडांची भर पडली आहे.

राज्याचे तत्कालीन वनमंत्री यांनी सन २०१६ मध्ये काढलेल्या शासन निर्णयानुसार सन २०१७ मध्ये चार कोटी झाडे, सन २०१८ मध्ये १३ कोटी झाडे तर २०१९ मध्ये ३३ कोटी झाडे लावण्याचा निर्धार व्यक्त केला होता. त्या तुलनेत राज्यात ५० कोटी वृक्ष लागवडीच्या धडक कार्यक्रमात उद्दिष्टापेक्षा अधिक झाडांची लागवड करण्यात आली होती. या लहान रोपांना जगविण्यासाठी पाणी देण्याची तरतूद नव्हती तसेच वणवे व गुरांपासून या रोपटय़ाचे संरक्षण करणे आव्हानात्मक होते. तरी लागवड क्षेत्राची निवड व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून या लागवडीकडे लक्ष दिले गेल्याने जिल्ह्यतील सुमारे ७० टक्के झाडे जिवंत असल्याचे वन विभागाच्या अहवालात नमूद आहे.

पालघर जिल्ह्यत सन २०१७ मध्ये २१.६२ लक्ष, सन २०१८ मध्ये ४०.४७ लक्ष तर २०१९ मध्ये ८०.३४ लक्ष वृक्ष रोप लागवड प्रत्यक्षात करण्यात आली होती. त्यापैकी सन २०१७ मध्ये लागवड केलेल्या झाडां पैकी ६७.०४ टक्के, २०१८ मधील लागवडीपैकी ७१.३९ टक्के तर २०१९ मधील लागवडीपैकी  ७१.४७ टक्के झाडे जिवंत असल्याची वन विभागाने माहिती दिली आहे. लागवड करताना तीन वर्षांत वन विभागाने सात लाख २५ हजार रोपांचे विनामूल्य वाटप केले असून सुमारे ७२ हजार रुपये विक्रीद्वारे  वितरित करण्यात आले.

५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत २०१७ ते २०१९ दरम्यान १५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत विविध ठिकाणी वन महोत्सव साजरा करण्यात आले. यामध्ये वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, वन विकास महामंडळ तसेच जिल्ह्यतील इतर शासकीय विभागांकडून रोपे लागवड करण्यात आली. जिल्ह्यत महाराष्ट्र हरित सेनेची एक लाख २२ हजार ६६८ सदस्यसंख्या नोंदणी झालेली असून त्याचे सदस्य, लोकप्रतिनिधी, महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक तसेच संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी गावातील प्रतिष्ठित  व ज्येष्ठ नागरिक सरकारी कर्मचारी अन्य विभागाचे कर्मचारी यांनी वृक्ष लागवड काम सहभाग घेतला होता. त्याचप्रमाणे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान सदस्यांतर्फे श्रमदानातून वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेण्यात आले होते.

डहाणू वन विभागाची कामगिरी

डहाणू वन विभाग क्षेत्रामध्ये जिल्ह्यतील डहाणू, पालघर, तलासरी व वसई हे चार तालुके येत असून या विभागात ११५०.७५ चौरस किलोमीटर वन क्षेत्र आहे. त्यापैकी वन विकास महामंडळाकडे १९१.२६ चौरस किलोमीटर वनक्षेत्र वर्ग करण्यात आले असल्याने वन विभागाकडे ९५९. ४९ चौरस किलोमीटर वनक्षेत्र शिल्लक आहे. तीन वर्षांच्या कालावधीत वृक्ष लागवड करण्याच्या उपक्रमांतर्गत डहाणू वन विभागाच्या भागात ३८४३ हेक्टर वन क्षेत्रावर ४१.३२ लक्ष वृक्ष लागवड करण्यात आली होती. यापैकीदेखील ७० टक्के रोपे जिवंत असल्याचे वन विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Crore trees live tree planting activities ssh

ताज्या बातम्या