दुर्घटनेच्या सावटाखाली कार्यालयीन कामकाज
पालघर : पालघर नगर परिषदेचे कार्यालयीन इमारत धोकादायक स्थितीत असतानाही या इमारतीतून कामकाज सुरू ठेवण्यात आले आहे. सुमारे ४० ते ४५ कर्मचारी जीव मुठीत घेऊन आपली सेवा देत असून येथे दररोज कामकाजानिमित्त येणाऱ्या १०० ते १२५ नागरिकांचाही जीव धोक्यात आहे. मुंबई, उपनगरात इमारत कोसळण्याच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती येथे होऊ नये यासाठी कार्यालय सुरक्षित ठिकाणी हलवण्याची मागणी कर्मचारी, नागरिकांकडून होत आहे.
ग्रामपंचायत काळात १९६०च्या सुमारास ही इमारत उभारण्यात आली आहे. नगर परिषदेची स्थापना झाल्यानंतर परिषदेचे कार्यालय या इमारतीतून सुरू करण्यात आले. सुमारे साडेतीन ते चार हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या जागेत पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर नगर परिषदेचे कार्यालय आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर व्यापारी गाळे, फूल व भाजीपाला बाजार असून या ठिकाणी नागरिकांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो.
ही इमारत धोकादायक असल्याचा अभिप्राय स्थापत्य अभियंता यांनी काही वर्षांपूर्वी दिला होता. तसेच इमारतीचा काही भाग यापूर्वी कोसळल्याच्या घटना घडल्या होत्या. इमारतींचे संरक्षणात्मक परिक्षणात (स्ट्रक्चरल ऑडिट) इमारतीचे मजबुतीकरण तसेच धोकादायक असलेला भाग पाडण्याचा अभिप्राय देण्यात आला होता. परंतु गेल्या वर्षी नगर परिषदेने फक्त रंगरंगोटीचे काम केले. धोकादायक इमारतीच्या मजबुतीकरण करण्याऐवजी फक्त मुलावा लावण्यात आला. या प्रकाराने काहीच साध्य होणार नसल्याबाबतचे आक्षेप नोंदवण्यात आल्यानंतर हे काम स्थगित करण्यात आले होते.
नगर परिषद कार्यालय भाडेतत्त्वावरील जागेत स्थलांतरित करण्यासाठी दोन वेळा निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. शहरातील काही विकासकांनी त्या अनुषंगाने आपले प्रस्ताव सादर केले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार असलेल्या भाडेदरांमध्ये तसेच विकासकांना असलेल्या अपेक्षित दरामध्ये मोठी तफावत असल्याने हे प्रस्ताव बारगळले.
पालघर नगर परिषदेच्या अग्निशमन कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर नगर परिषदेचे कार्यालय स्थलांतरित करण्याचे सन २०१९ मध्ये निश्चित झाले होते. त्यादृष्टीने हालचालीदेखील अंतिम टप्प्यात असताना पालघरच्या उपविभागीय अधिकारी यांनी आपले कार्यालय नगर परिषदेच्या वास्तूमध्ये स्थलांतरित केल्याने नगर परिषद कार्यालय स्थलांतराचा प्रस्ताव लांबणीवर पडला.
पालघर जिल्हा मुख्यालय संकुल तयार होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्याची प्रमुख कार्यालये तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालय नवीन संकुल इमारतीमध्ये लवकरच स्थलांतरित होण्याची शक्यता आहे. ही कार्यालये स्थलांतरित झाल्यानंतर मोकळ्या होणाऱ्या इतर कार्यालयांच्या जागेत नगर परिषदेचे कार्यालय स्थलांतरित करण्याचा विचार असल्याचे पालघरच्या मुख्याधिकारी स्वाती देशपांडे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
पालघर नगर परिषदेच्या नवीन कार्यालय उभारण्यासाठी असलेले जागेचे आरक्षण शहराच्या पूर्वेकडील दुर्गम ठिकाणी आहे. हे ठिकाण सर्वसामान्य नागरिकांना गैरसोयीचे असल्याने त्याला विरोध करण्यात आला आहे. नगर परिषदेच्या कार्यालयीन इमारतीकरिता जागेचे आरक्षण बदलण्याची प्रक्रिया सुरू असून त्याला मंजुरी मिळाल्यानंतर नगर परिषदेच्या नवीन कार्यालय इमारतीचे उभारणे सुरू करण्यात येईल, असे मुख्याधिकारी यांनी पुढे सांगितले.
देखभाल दुरुस्ती नाही
नगर परिषदेच्या कार्यालय इमारतीची देखभाल दुरुस्ती तसेच रंगरंगोटी गेल्या तीस-चाळीस वर्षांपासून झाल्याचे दिसून येत नाही. या इमारतीचा काही भाग खचल्याचे तसेच इमारतीवर झाडेझुडपे वाढल्याचेदेखील दिसून येते. कार्यालयातील अंतर्गत दालनांची यापूर्वी रंगरंगोटी झाली असली तरी इमारतीच्या मजबुतीकरणासाठी नगर परिषदेने कोणतीही पावले गेल्या २२ वर्षांत उचलली नसल्याचे दिसून येते.