पालघर मधील डहाणू तालुक्यातील कैनाड येथील एका महिलेच्या प्रसूतीनंतर नवजात शिशु आणि नंतर बाळंत महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. गर्भवती महिलेच्या पोटातील बाळाचा पोटातच मृत्यू झाला असून प्रसूतीनंतर वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

डहाणू तालुक्यातील कैनाड येथील सायनु जितेश सावर (२५) ही महिला गरोदर असून आपल्या माहेरी कैनाड येथे असताना रविवार २७ एप्रिल रोजी तिच्या पोटात कळा येऊन पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यांनतर तिच्या कुटुंबीयांनी तिला तत्काळ आशागड येथील प्राथमिक उपचार केंद्रात उपचारासाठी दाखल केले. याठिकाणी तिची प्राथमिक तपासणी केल्यानंतर तिला पुढे उपजिल्हा रुग्णालय डहाणू येथे नेण्याचा सल्ला येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. त्यानुसार महिलेला उपजिल्हा रुग्णालयात नेले असता त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर दुपारी २ वाजता दरम्यान तिची प्रसूती झाली. प्रसूती दरम्यान नवजात शिशु मृतावस्थेत असल्याचे आढळून आले असून महिलेला अतिरक्तस्राव झाल्याचे निदर्शनास आले. यांनतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला पुढील उपचारासाठी गुजरात मधील रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. कुटुंबीयांनी पुढील उपचारासाठी नेण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केले असता उशीर झाल्यामुळे संध्याकाळी पाचा वाजता दरम्यान महिलेला १०८ रुग्णवाहिकेमध्ये उपचारासाठी नेण्यात येत असताना तलासरी नाहिक तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

पालघर जिल्ह्याचे विभाजन होऊन ११ वर्ष उलटून देखील डहाणू सारख्या आदिवासी बहुल भागामध्ये आरोग्य व्यवस्था बळकट नसल्यामुळे येथील गोरगरीब आदिवासींची उपचाराअभावी फरफट होत असल्याचा मुद्दा विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित केला. तसेच डहाणू येथील घटनेबाबत रोष व्यक्त करत या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश आरोग्य संचालक, पालघर यांना देण्यात आले आहेत. शिवाय अश्या प्रकारच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ग्रामीण भागात आवश्यक वैद्यकीय व्यवस्था उपलब्ध करून त्याला बळकटी देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच “ही घटना केवळ एका कुटुंबांचे नुकसान नसून संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे” असे मत त्यांनी व्यक्त केले.

माझी बहिण गर्भवती असताना आम्ही नियमित तिच्या आरोग्याची तपासणी केली. रविवारी तिला त्रास झाल्यानंतर आम्ही तत्काळ येथील आशा ताईंनी संपर्क करून बहिणीची तपासणी केली. त्यांनतर आम्ही उपजिल्हा रुग्णालयात नेले असता त्याठिकाणी प्रसूती नंतर बाळाचा मृत्यु झाल्याचे समजले. बहिणीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली मात्र त्यांनतर काही वेळात बहिणीची प्रकृती खालावली असून तिला तत्काळ पुढील उपचारासाठी नेण्याची सूचना अधिकाऱ्यांनी दिली. मात्र वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे बहिणीला पुढील उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी उशीर झाला असून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे. – रत्नाकर म्हसे, मृत महिलेचा भाऊ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मृत महिलेच्या पोटातील बाळाचा एक दिवस आधीच मृत्यू झाला असून महिलेच्या पोटात अतिरक्तस्राव झाला होता. रुग्णालयात आल्यानंतर ही बाब लक्षात झाली असून प्रसूतीनंतर काही वेळ महिलेची प्रकृती स्थिर होती. मात्र रक्तस्त्राव सुरू असल्यामुळे तिला पुढील उपचारासाठी पाठवण्याचा सल्ला देण्यात आला होता. – डॉ. रामदास मराड, जिल्हा शल्य चिकित्सक