scorecardresearch

आमसभांची ‘रखडपट्टी’; तीन वर्षांपासून लोकप्रतिनिधींना वेळ मिळेना

आचारसंहिता, करोना व  स्थानिक लोकप्रतिनिधींना वेळ नसल्याची कारणे देण्यात येत असली तरी आमसभा न झाल्यामुळे विकासकामांना मात्र खीळ बसली आहे.

आमसभांची ‘रखडपट्टी’; तीन वर्षांपासून लोकप्रतिनिधींना वेळ मिळेना

जिल्ह्य़ातील विकासकामांना फटका

वाडा: पालघर जिल्ह्यातील तालुक्यांची आमसभा गेल्या तीन वर्षांपासून झालेली नाही. याबाबत आचारसंहिता, करोना व  स्थानिक लोकप्रतिनिधींना वेळ नसल्याची कारणे देण्यात येत असली तरी आमसभा न झाल्यामुळे विकासकामांना मात्र खीळ बसली आहे. वाडा पंचायत समितीची मागील आमसभा १९ ऑगस्ट २०१९ रोजी झाली होती. त्यानंतर तब्बल साडेतीन वर्षे येथील आमसभेबाबत कुणीही वाच्यता केलेली नाही. विक्रमगड, पालघर तालुक्याची आमसभा चार वर्षे झालेली नाही. अशीच परिस्थिती डहाणू, तलासरी, जव्हार, मोखाडा  तालुक्यांची आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी प्रत्येक तालुक्याची आमसभा स्थानिक आमदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आयोजित करीत असतात. या आमसभेत तालुक्यातील गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच  ग्रामस्थ आपापल्या गावातील सार्वजनिक समस्या  आमदारांमार्फत वरिष्ठांपर्यंत पोहोचवीत असतात.

असे असले तरी याआधी  झालेल्या आमसभेचे प्रश्न पुढील आमसभा येईपर्यंत सुटलेले नाहीत. तेच प्रश्न आमसभेत येत असल्याने या आमसभेतील ठरावांना केराची टोपली दाखवली जाते काय, असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान याबाबत  जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), विविध ग्रामपंचायतींचे गटविकास अधिकारी यांना विचारणा केली असता आमसभेचे अध्यक्ष स्थानिक आमदार असतात. त्यांनी वेळ दिल्यानंतरच आमसभेचे आयोजन करता येते, असे सांगितले.

तीन आमदार मिळूनही स्वप्न अपुरे

सन २००८ मध्ये नव्याने पुनर्रचित झालेल्या विधानसभा क्षेत्रात वाडा तालुका शहापूर, विक्रमगड, भिवंडी या तीन मतदारसंघांत विभागला गेला. वाडा तालुक्याला तीन आमदार मिळाल्याने या तालुक्याचा विकास तिप्पट वेगाने होईल असे स्वप्न होते.  मात्र गेल्या १४ वर्षांत एकही मोठे काम झालेले नाही. येथील रस्त्यांची दुरवस्था. डाहे पाणी प्रकल्प, नद्यांवरील पुलांची कामे, क्रीडांगण अशी अनेक कामे रखडली आहेत.

आमसभेत घेतलेल्या ठरावांची दखल अधिकारी वर्गाकडून घेतली जात नसल्याने आमसभेचे महत्त्व कमी होऊ लागले आहे. 

– अरुण पाटील – माजी सरपंच, गांध्रे, ता. वाडा

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-12-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या