धामणी धरण ९५ टक्के भरले

. पाऊस जोरात सुरू असल्याने धामणी धरणातील पाण्याची पातळी वाढत आहे.

सूर्या नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

कासा : पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे सूर्या नदीवरील धामणी धरण ९५ टक्के भरले आहे.  सध्या पाऊस मोठय़ा प्रमाणात सुरू असल्यामुळे धामणी धरणाच्या खालच्या बाजूला असणारा कवडास उन्नई बंधारा १०० टक्के भरला असून तो ओसंडून वाहात आहे. त्यातून १५००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दोन दिवसांपासून  सातत्याने जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने सूर्या नदी दुथडी भरून वाहात आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच या कालावधीत नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहनही धरण प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सूर्या नदीला मोठय़ा प्रमाणात पूर आलेला आहे. पाऊस जोरात सुरू असल्याने धामणी धरणातील पाण्याची पातळी वाढत आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडले जाऊ शकतात. त्यामुळे नदीतील पाण्याची पातळी अचानक वाढू शकते म्हणून आंघोळीसाठी किंवा मासेमारीसाठी नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये म्हणून प्रशासनाने नागरिकांना सूचना दिल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Dhamani dam in palghar filled with 95 percent of water zws