कासा : गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेली महालक्ष्मी मातेची यात्रा या वर्षी १७ एप्रिलपासून सुरू होत आहे. यात्रा भरण्यास परवानगी दिली असली, तरी प्रशासनाने यात्रेतील ठेवलेल्या वेळ मर्यादेबद्दल व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यात्रेचा उत्साह मध्यरात्री दोन ते तीन वाजेपर्यंत असतो, परंतु वेळेची मर्यादा रात्री १० वाजेपर्यंत केल्यामुळे आर्थिक उत्पन्नावर परिणाम होईल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी माता ही गुजरात, पालघर, दादरा नगर हवेली, नाशिक या ठिकाणाहून लाखो भक्त दर्शनासाठी आणि यात्रेतील खरेदीसाठी येत असतात. सध्या उन्हाळा असल्यामुळे दिवसभर कडक उन्हामध्ये यात्रेत येणाऱ्यांची संख्या कमी असते. संध्याकाळ झाल्यानंतर मंदिराकडे येणाऱ्या यात्रेकरूंची संख्या वाढत जाते. रात्री दोन ते अडीच वाजेपर्यंत अनेक यात्रेकरू दर्शन घेऊन यात्रेचा आनंद घेत असतात. यात्रा पंधरा दिवस सुरू असते. यात्रेमध्ये विविध वस्तू, खाद्यपदार्थाची मोठय़ा प्रमाणात विक्री होत असते. गेली दोन वर्षे यात्रा बंद असल्यामुळे मंदिर परिसरातील व्यापारी, तसेच बाहेरून येणारे विक्रेते यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. यावर्षी यात्रा सुरू होणार म्हणून व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी वेळ मर्यादा ठरवून दिल्यामुळे व्यवसाय करणे अवघड होणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. महालक्ष्मी यात्रेत तात्पुरत्या स्वरूपात दुकाने लावणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात असते. हे व्यापारी मंदिर परिसरातील जमीन तात्पुरत्या स्वरूपात भाडय़ाने घेतात.
पंधरा दिवसांचे भाडे तीस हजार रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंत असते. यात्रा भरणार असल्याने व्यापाऱ्यांनी मोठय़ा प्रमाणात माल भरला आहे. जर दुकाने दहा वाजेपर्यंत चालू ठेवण्याची परवानगी दिली तर व्यवसाय किती आणि कसा होणार, भरलेला मालही विकेल की नाही अशी भीती व्यापाऱ्यांमध्ये आहे. जो व्यवसाय होईल त्यामधून जागा भाडे वीज बिल कामगारांचा पगार देणेही शक्य होणार नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. तरी जिल्हा प्रशासनाने नेहमीप्रमाणे किमान बारा वाजेपर्यंत तरी यात्रा भरण्यास परवानगी देण्याची मागणी व्यापारी वर्ग करत आहे.