पालघर : पालघर जिल्ह्यातील करोनामुळे अनाथ झालेल्या एकूण १२ बालके असून या बालकांना प्रत्येकी पाच लक्ष रुपयांचे मुदत ठेव प्रमाणपत्र वितरण पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले.

करोनामध्ये दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या एकंदर १२ इतकी असून त्यापैकी तीन बालकांना मोखाडा पंचायत समिती येथे झालेल्या कार्यक्रमात पाच लाख रुपयांची मुदत ठेव प्रमाणपत्रे वितरित करण्यात आले होते. उर्वरित नऊ बालकांना मुदत ठेव प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आज आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी अनाथ मुलांचे नातेवाईक तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या नऊ  बालकांपैकी दोन बालके डहाणू तालुक्यातील असून वसई तालुक्यातील सात बालकांचा समावेश आहे. करोनाकाळात जिल्ह्यतील एकूण ५६३ बालकांनी एक तसेच दोन पालक गमावले आहेत. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयास संपर्क, इतर यंत्रणा यांच्या माध्यमातून अनाथ झालेल्या बालकांची संख्या अजूनही वाढत आहे. एकूण ५६३ पैकी द्विपालक गमावलेल्या अनाथ बालकांची संख्या १२ असून त्यांच्या बाबतीतील पूर्ण कार्यवाही करून त्यांना पाच लाख रुपयांची मुदत ठेव प्रमाणपत्र शासनामार्फत देण्यात येत आहे.

या एकूण ५६३ पैकी २७८ बालकांची कार्यवाही पूर्ण होऊन, त्यातील १०९ बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ दरमहा ११०० रुपये याप्रमाणे प्राप्त अनुदानातून देण्यात येत आहे.