scorecardresearch

जिल्हा रुग्णालयाचा खर्च वाढणार:१६८ कोटी रुपये बांधकाम खर्चासाठी वाढीव दराने निविदा; आरोग्य समितीच्या निर्णयाची प्रतीक्षा

पालघर येथे राष्ट्रीय आरोग्य मिशनतर्फे उभारण्यात येणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सुमारे १६८ कोटी रुपये अंदाजित बांधकाम खर्चासाठी मागवण्यात आलेल्या निविदा १७ ते १८ टक्के अधिक दराने ठेकेदाराने भरल्या आहेत.

पालघर : पालघर येथे राष्ट्रीय आरोग्य मिशनतर्फे उभारण्यात येणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सुमारे १६८ कोटी रुपये अंदाजित बांधकाम खर्चासाठी मागवण्यात आलेल्या निविदा १७ ते १८ टक्के अधिक दराने ठेकेदाराने भरल्या आहेत. त्या मंजूर करावयाच्या की पुन्हा नव्याने सुधारित अंदाजपत्रक बनवून निविदा प्रक्रिया राबवायची याबाबतचा निर्णय आरोग्य विभागाची राज्यस्तरीय समिती निर्णय घेणार आहे. त्यामुळे रुग्णालयाचे भवितव्य समितीच्या हाती आहे.
पालघर येथे राष्ट्रीय आरोग्य मिशनतर्फे हे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. २०० खाटांच्या या रुग्णालयासाठी १० एकर जागा मंजूर करण्यात आली आहे. रुग्णालयाचे दोन वर्षांपूर्वी आराखडा व अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. मात्र पर्यावरण विभागाकडून परवानगी तसेच इतर तांत्रिक मान्यता मिळण्यास विलंब लागल्याने रुग्णालयाची निविदा प्रक्रिया लांबणीवर पडली होती. या प्रकल्पासाठी १९२०-२१ वर्षांतील दर सूचीच्या आधारे अंदाजपत्र तयार करण्यात आले असले तरी निविदा २०२०-२१ वर्षांत काढण्यात आली. या दरम्यानच्या काळात सिमेंट, रेती-माती, स्टील व इतर कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने दर ७.५ टक्क्यांनी वाढला. त्यामुळे निविदा भरताना निविदा रकमेपेक्षा अधिक रकमेने ठेका घेण्यासाठी ठेकेदारांनी अर्ज भरले होते.
निविदा रकमेपेक्षा काही प्रमाणात अधिक दराने निविदा भरल्या गेल्याने त्याबाबतचा निर्णय राज्यस्तरीय वित्त समिती घेत असते. या प्रकरणी खासदार राजेंद्र गावीत यांनी प्रयत्न करून पालघर सामान्य रुग्णालयाबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती केली होती. ही निविदा रद्द झाल्यास नव्याने अंदाजपत्रक तयार करून पुन्हा संपूर्ण निविदा प्रक्रिया राबविणे विलंबाचे ठरणार असल्याने तसेच पावसाळय़ापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण न झाल्यास बांधकामाचे चार महिने वाया जातील.
आरोग्य विभागाच्या संचालिका साधना तायडे, आयुक्त व इतर सदस्यांच्या उपस्थित समितीची बैठक मुंबईत २५ एप्रिल सायंकाळी बैठक झाली. ठेकेदारांशी चर्चा करून दर कमी करण्यात यावेत अथवा नव्याने अंदाजपत्रक काढून पुन्हा निविदा प्रक्रिया राबविण्याबाबतचा अहवाल ही समिती शासनाला देणार आहे.
दरम्यान, या बांधकामाकरिता १० एकर जागा पुरेशी नसून जागा वाढवून देण्याकरिता दिल्ली येथील उच्चस्तरीय समितीने सूचना दिल्या आहेत. मंजूर जागेपेक्षा किमान २० एकर जागेची आवश्यकता असून १० एकर जागा वैद्याकीय महाविद्यालयासाठी मंजूर करण्यात आली आहे. अतिरिक्त जागेकरिता सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांशी विचारविनिमय सुरू आहे.
जी प्लस थ्री इमारत
अत्यावश्यक ओपीडी ग्राउंड, त्याच बाजूला प्रतीक्षा कक्ष, कुठेही गर्दी होऊ नये यासाठी मोकळी जागा, एमरजन्सी रॅम्प, तळमजल्यावर डिलिव्हरी रूम, पहिल्या मजल्यावर शस्त्रक्रिया विभाग, तिसऱ्या मजल्यावर कार्यालय, भूमिगत वाहनतळ.
रुग्णालय प्रकल्प
खर्च रुपये २१० कोटी
२०० खाटा
१० एकर जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कामांना मंजुरी

मिळालेली मंजुरी
• फायर एनओसी.
• राज्य पर्यावरण विभागाच्या सचिवांची मंजुरी.
• सिडकोकडून बांधकामविषयक परवानगी.
• या कामाला कोकण विभागाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्य अभियंता यांच्याकडून ६ एप्रिल २०२१ रोजी तांत्रिक मंजुरी.
• मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग विद्युत विभागाकडून तांत्रिक मंजुरी, संरक्षक भिंत बांधण्याचे काम प्रगतिपथावर.
जागेचे क्षेत्रफळ (चौ.मी.)
• २०० बेडचे रुग्णालय : २१५०६
• कर्मचारी वसाहत : १३९१२
• जिल्हा हॉस्पिटल प्रशिक्षण केंद्र : १२००
• नर्सिग महाविद्यालय : २२०४
• नर्सिग हॉस्टेल्स : २८५७
• स्वयंपाकघराकरिता : २२५०
• उपाहारगृह : २५०
• एमसीएच विंग : १०० बेडसाठी ८०००
• एकूण बांधकामाचे क्षेत्रफळ (प्रस्तावित): ५२२३३

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: District hospital expenditure increased tender construction increased rate decision health committee amy

ताज्या बातम्या