पालघर: येत्या दोन वर्षांमध्ये पालघर जिल्ह्याचे मुख्य क्रीडा संकुल अद्ययावत करून त्यात खेळाडूंसाठी सर्व सोयीसुविधा देऊ अशी ग्वाही पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी दिली आहे. पालघर नियोजन भवनामध्ये क्रीडा शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या प्रशिक्षण व नियोजन कार्यक्रमात ते बोलत होते.

पालघर जिल्ह्यासाठी भव्य-दिव्य असे क्रीडा संकुलासाठी जमीन उपलब्ध झाली आहे. त्याच्या विकासासाठी निधीही प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि नवे खेळाडू घडवण्यासाठी हे संकुल महत्त्वाचे ठरणार आहे. क्रीडा शिक्षकांनी लहान मुलांमधील खेळाची हुन्नर ओळखून चांगले खेळाडू घडवण्यास प्राधान्य द्यायला हवे. जेणेकरून जिल्ह्यातील खेळाडू राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळतील, असे आवाहन बोडके यांनी उपस्थित क्रीडा शिक्षकांना केले. मात्र काही शाळा विद्यार्थ्यांना तालुका व जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अनुमती देत नाहीत अशी खंत क्रीडा अधिकाऱ्यांनी बोलून दाखवली. त्यावेळी अशा स्पर्धामध्ये विद्यार्थ्यांना पाठविण्यासाठी शाळांकरिता पत्रक काढा असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले.पालघर पंचायत समितीचे शिक्षणाधिकारी निमिष मोहिते, प्रकाश वाघ, तेजस्वी पाटील, सरिता वळवी, किरण थोरात आदी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

क्रीडा संकुल प्रस्तावित
जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये तालुका क्रीडा संकुलाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. दोन ते तीन महिन्यांत या संकुलांना मान्यता मिळणार आहे. त्याचप्रमाणे या वर्षांपासून पालघर जिल्हा क्रीडा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. प्रथमच राज्यस्तरावरील हँडबॉल व बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन पालघर जिल्ह्यात करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने यांनी या कार्यक्रमात दिली.