परतीच्या पावसाचे दुहेरी संकट

 वाडा तालुक्यात रब्बी हंगामात जवळपास दोन हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर  तूर, तीळ, हरभरा, वाल, मूग यांचे हजारो टन उत्पादन घेतले जाते.

|| रमेश पाटील

वाडा तालुक्यात रब्बी हंगाम धोक्यात

वाडा:  भातकापणीचा हंगाम सुरू असताना परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. या परतीच्या पावसाने हळव्या वाणातील भातपिकाचे नुकसान केलेच, पण या पावसामुळे येणारा रब्बी हंगामही हातातून जातो की काय या दुहेरी संकटाने येथील शेतकऱ्यांना ग्रासले आहे.

 वाडा तालुक्यात रब्बी हंगामात जवळपास दोन हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर  तूर, तीळ, हरभरा, वाल, मूग यांचे हजारो टन उत्पादन घेतले जाते. मौजे गातेस, कोनसई, चिखले आदी गावांत रब्बीमध्ये हरभराचे पीक लवकर घेण्यासाठी  शेतकऱ्यांनी शंभर हेक्टरहून अधिक क्षेत्र ओसाड ठेवले आहे. मात्र येथील ओसाड ठेवलेल्या जमिनी अद्याप चिखलमय आहेत.           गातेस खुर्द व गातेस बुद्रुक या दोन गावांमधील १२७ शेतकरी रब्बी हंगामामध्ये ओसाड ठेवलेल्या दोनशे एकर शेतजमिनीवर दसरा सणानंतर हरभरा पिकाची पेरणी करतात आणि डिसेंबर महिन्यात शेतकरी ओल्या हरभराची विक्री करतात. शंभर ते दीडशे रुपये प्रति किलोला ओला हरभराचा दर मिळत आहे. मात्र गतवर्षाप्रमाणे या वर्षीही हरभऱ्याचा हंगाम निघून गेला तर पुन्हा मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागेल, अशी शेतकऱ्यांना चिंता आहे.

खरीप, रब्बी पिकांवर पाणी

रब्बी (ओसाड) ठेवलेल्या जागेत दिवाळीपूर्वीच हरभराची पेरणी केली जाते. ऑक्टोबर महिन्यातील उष्णतेमुळे हरभरा पिकाची उगवण चांगली होते. नोव्हेंबरअखेरच्या थंडीमुळे फुटवा चांगला होऊन डिसेंबरअखेरीस उत्पादनालाही सुरुवात होते. मात्र परतीच्या पावसाने येथील शेतकऱ्यांचे हरभरा पिकाचे वेळेचे गणितच बिघडविले आहे. खरीप हंगामात काही शेतकऱ्यांचे भातपिकांचे नुकसान व रब्बी हंगामात कडधान्य पिकांचा हंगाम निघून चालला असल्याने  शेतकरी संकटात सापडला आहे.

नोव्हेंबर महिन्यात हरभरा पीक फुलावर येते. डिसेंबर महिन्यात हरभऱ्याचे उत्पन्न सुरू होते. हरभरा पिकाचा हंगाम पावसात गेल्याने हरभरा पीक घेणाऱ्या आम्हा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. -कुमार पष्टे, हरभरा उत्पादक शेतकरी, गातेस, ता. वाडा.

रब्बी पीक घेण्यासाठी ओसाड ठेवलेल्या क्षेत्रावर अति पावसामुळे रब्बी पीक घेता आले नाही, तर आम्हा शेतकऱ्यांना शासनाने नुकसानभरपाई द्यावी. -प्रशांत गोतारणे,  शेतकरी, गातेस,  ता. वाडा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पालघर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Double crisis of return rains flood akp