अजूनही एकजण फरार
पालघर : जायशेत गांजे ढेकाळे येथे करोना जनजागृती करणाऱ्या आरोग्य पथकावर हल्ला करणाऱ्या आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या पथकातील वैद्यकीय अधिकारी यांच्यासह आरोग्य कर्मचारी यांना मारहाण करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली होती.
गेल्या आठवड्यात पोलिसांनी संजय धोडी या म्होरक्याला ठाकूर पाड्यात छापा टाकून ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर इतर पाच आरोपी मनोर पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. शुक्रवारी पाच आरोपींना मनोर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. यातील एक आरोपी अजूनही फरार आहे.
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गांजेढेकाळे जायशेत रस्त्यावर चित्ररथातून करोना व लसीकरणबाबतची जनजागृती करणाऱ्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना मद्यपान केलेल्या गावगुंडांकडून मारहाण करून चित्ररथाची तोडफोड करण्यात आली होती.
मनोर पोलीस ठाण्यात तसा गुन्हा दाखल होता. त्या वेळी पोलिसांनी या प्रकरणात दोघांना अटक केली होती. या प्रकरणात आरोग्य अधिकारी-कर्मचारी संघटनांनी निषेध दर्शविला होता व इतर आरोपीना अटक न केल्यास काम बंदचा इशारा दिला होता.
या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ‘ऑपरेशन कोम्बिंग’ राबवले. मात्र आरोपी घनदाट जंगलात लपून बसल्याने पोलिसांना हाती लागले नव्हते. गेल्या आठवड्यात या प्रकरणातील मुख्य सूत्रधार व म्होरक्या याला पोलिसांनी पकडल्यानंतर यातील इतर पाच आरोपी पोलीस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी त्यांना अटक केली. आतापर्यंत आठ आरोपी ताब्यात घेतले असून एक फरार आहे.