करोनामुळे ‘रोजगार हमी’ संकटात

यंदा आठ हजार ८७२ कामे शेल्फवर उपलब्ध आहेत.

रोहयोसाठी मजुरांची तोकडी उपस्थिती; कष्टकऱ्यांचा पोटापाण्याचा प्रश्न गंभीर

पालघर : पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागांमध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये संक्रमण मोठय़ा प्रमाणात झाल्यामुळे रोजगार हमी योजनेच्या कामांवर मजूर उपस्थिती कमी झाल्याचे दिसून येते. मजुरांना या संक्रमणामुळे कामांपासून परावृत्त व्हावे लागल्याने त्यांची आर्थिक स्थिती खालावत चालली आहे.

सद्य:स्थितीत विविध शासकीय यंत्रणा व ग्रामपंचायत अशी मिळून हजारो कामे शेल्फवर उपलब्ध असली तरी करोनासदृश परिस्थितीमुळे मजूर कामांसाठी पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी हे मजूर स्वत:ची काळजी घेत आहे. पालघर जिल्ह्यात अनुसूचित जाती-जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व इतर जमातीच्या एकूण एक लाख ८८ हजार मजूर जॉब कार्ड धारक आहेत.

तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती, ग्रामपंचायत, वन विभाग व जिल्हा परिषद मिळून त्यांच्या अखत्यारीत असलेल्या कामांपैकी काही कामे रोजगार हमी योजनेअंतर्गत राखीव ठेवली जातात. तेथून ती कामे या मजुरांसाठी उपलब्ध करून दिली जात आहेत.

यंदा आठ हजार ८७२ कामे शेल्फवर उपलब्ध आहेत. यंत्रणांकडील कामांवर १३ लाख ५५ हजार ५१० मजूर तर ग्रामपंचायत कामांवर तीन लाख ५४ हजार ५७८ मजूर काम करतील एवढी क्षमता आहे. जुलैच्या तिसऱ्या आठवडय़ापर्यंत ग्रामपंचायतीने चौतीस तर यंत्रणेने बावीस कामे सुरू केलेली आहेत. ग्रामपंचायतमधील ८५ व यंत्रणेकडून २५१ कामे पूर्ण झालेली आहेत. ही आकडेवारी कमी आहे. यातील काही कामे प्रगतिपथावर आहेत.

यंदा २३ लाख ६९ हजार इतके उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. त्यातील कामे सुरू असली तरी ती कमी प्रमाणातील आहेत. याउलट गेल्या वर्षी २८ लाख मनुष्यदिन निर्मिती करण्याचे उद्दिष्ट पालघर जिल्ह्यासमोर होते. पैकी तब्बल ४९ लाख ७२ हजार मनुष्यदिन निर्मिती पूर्ण केलेली आहे.

ग्रामीण भागात करोनाबद्दल भीती

पालघर जिल्ह्यात सहा लाख १४ हजार ५४८ इतके मजूर नोंदणीकृत आहेत. यापैकी दोन लाख १८ हजार ४१३ सलग कामे करणारे मजूर आहेत. तर ९० दिवसांपेक्षा जास्त कामे केलेले ५५७०२ मजूर आहेत. यंदा प्रशासनामार्फत या मजुरांना प्रतिबंधात्मक नियम पाळून कामावर येण्याचे आवाहन केले असले तरी ग्रामीण भागात करोनाबद्दलची भीती असल्यामुळे हे मजूर वर्ग कामावर येत नाहीत. त्यामुळे रोजगार हमी योजनेच्या कामांना फटका बसला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Employment guarantee crisis due to corona ssh