वाडा: जंगलातील काही झाडांपासून मिळणारी फळे, फुले व बिया येथील आदिवासींना वरदान ठरत असून या जंगली रानमेव्याची विक्री करून एक चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे. विशेषत: तालुक्याच्या ठिकाणी व्यापा-यांकडून वस्तुविनिमय पद्धतीने या रानमेव्याची खरेदी होत असल्याने या माध्यमातून आदिवासींना संसार उपयोगी वस्तू उपलब्ध होत आहेत.
पालघर जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर जंगलसंपत्ती आहे. या जिल्ह्यात विक्रमगड, जव्हार, मोखाडा, तलासरी, डहाणू व वाडा हे तालुके आदिवासीबहुल तालुके म्हणून ओळखले जातात. या तालुक्यातील जंगल भागात राहणारी शेकडो आदिवासी कुटुंबे ही जंगलातून विविध झाडांपासून मिळणारी फळे, फुले व बी विकून आपला संसारगाडा चालवत असतात.
जंगलातील साग, निलगिरी, अकेशिया, काजू, गुंज, मोह, चिंच, करंज, सीताफळ, िडक, सागरगोटे, रिठा, बावा आदी जंगली झाडांच्या बिया तसेच सुकविलेली मोहफुले व तेलबिया यांची विक्री करून रोजगार मिळवत आहेत.
जंगली झाडे व अन्य वनऔषधी वनस्पती यांच्या बियांना शहरी भागात खूप मागणी आहे. तसेच विविध जंगली झाडांच्या रोपवाटिकेचा व्यवसाय करणाऱ्यांकडून या बियाणांची विशेष खरेदी केली जाते.
विक्रमगड, जव्हार , मोखाडा या तालुक्याच्या ठिकाणी भरणाऱ्या आठवडा बाजारात ही जंगली झाडांची बियाणे, फुले खरेदी करण्यासाठी खास व्यापारी येत असतात. जंगली वनस्पतींची काही फुले, बिया या नाशवंत असल्याने त्यांची योग्य साठवण केली तरच फायदेशीर ठरते, असे विक्रमगडचे व्यापारी मिलिंद भानुशाली म्हटले आहे.
दरम्यान, किमती बियाणे घेऊन त्या बदल्यात सामान्य माल देऊन वस्तुविनिमय पद्धतीने व्यापाऱ्यांकडून आदिवासींची लूट होत असल्याचा आरोप आदिवासी मुक्ती मोर्चाचे वाडा तालुका अध्यक्ष अनंता वनगा यांनी केला आहे. शासनाने या जंगली बिया खरेदी करण्याची व्यवस्था निर्माण करावी अशी मागणी वनगा यांनी केली आहे.
बियाणाच्या बदल्यात कांदा, बटाटा आठवडा बाजारात येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून जंगली वनस्पतींचे बियाणे खरेदी केले जाते व त्या बदल्यात व्यापारी मिरची पावडर, डाळी, कांदा, बटाटा तसेच संसार उपयोगी भांडी देत असतात. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा पैशाचा व्यवहार होत नाही. वस्तूंच्या बदल्यात वस्तूच दिली जाते.
येथील आदिवासींनी जंगलातून गोळा केलेल्या विविध वनस्पतींच्या बिया, फुले यांची खरेदी आदिवासी विकास महामंडळाकडून झाल्यास आदिवासींना अधिक किंमत (दर) मिळेल.-शामराव आळशी, माजी चेअरमन, खरेदी-विक्री संघ विक्रमगड