वाडा: वाडा, विक्रमगड जव्हार या तिन्ही तालुक्यांतील काही निवडक शेतकऱ्यांना गावठी हापूस, केसर या आंब्यानी आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यास चांगली मदत केली आहे. आंब्यांचे चांगले उत्पादन आल्याने आंबा बागायतदार शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
शासनाच्या कृषी विभागाकडून तसेच काही सेवाभावी संस्थांच्या मदतीने गेल्या ८ ते १० वर्षांपूर्वी वाडा, विक्रमगड, जव्हार तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना फलोत्पादन योजना अंतर्गत मोफत आंब्याचे कलम (रोप) देण्यात आले होते. या आंब्यांच्या रोपांची शेतकऱ्यांनी चांगली मशागत केली. यावर्षी या झाडांना चांगल्या प्रकारे आंबे लागले आहेत. जवळपास मोठय़ा बाजारपेठा नसल्याने व पिकलेले आंबे जास्त काळ साठविण्याची व्यवस्था नसल्याने येथील शेतकऱ्यांनी काढणी केलेले कच्चे आंबे ६० ते ७० रुपये किलो दराने विक्री करण्यास सुरुवात केली आहे. आंब्याच्या झाडावर कुठल्याही प्रकारची रासायनिक औषधांची फवारणी तसेच रासायनिक खतांचा वापर नसलेल्या या गावठी आंब्यांना चांगली मागणी येत आहे. सेंद्रिय शेतीतून उत्पादित झालेल्या या गावठी हापूस, केसर आंब्याला बाजारात चांगली मागणी आल्याने येथील बाजारपेठांमध्ये अन्य राज्यातील, जिल्ह्यातील आंब्याची आवक घसरली आहे. येथील बराचसा ग्राहकांचा ओढा गावठी हापूस, केसर घेण्याकडेच दिसून येत आहे.
याबाबत वाडा तालुक्यातील सांगे गावातील कृषीभूषण शेतकरी अनिल पाटील यांनी शेतकऱ्यांनी आता फळबाग शेतीकडे अधिक लक्ष देण्याची काळाची गरज आहे, असे सांगून शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले आहे.
व्यापारी शेतकऱ्यांच्या दारात
शेतकऱ्यांनी पिकविलेले धान्य, कडधान्य, भाजीपाला विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या दारात जावे लागते, मात्र येथील आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या दारात व्यापारी आंबे खरेदीसाठी फेऱ्या मारू लागले आहेत. वाडा कोलमने बाजारपेठेत चांगले स्थान मिळविले त्याचप्रमाणे लवकरच येथील गावठी हापूस, केसर आंबा स्थान मिळवेल, असा विश्वास येथील आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.