पालघर : कोकण मराठी साहित्य परिषदेचे सहावे  राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन पालघरच्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात ११ व १२ जून रोजी आयोजित करण्यात आले असून दोन दिवसीय संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून  दोन दिवस पालघर जिल्ह्यातील साहित्यप्रेमींना साहित्य, संस्कृती मेजवानीचा आस्वाद घेण्यास मिळणार आहे.   

ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके साहित्यनगरी असे संबोधल्या जाणाऱ्या या परिसरातील सभागृहाला अनुताई वाघ सभागृह असे नामकरण करण्यात आले आहे.  साहित्यनगरीतील प्रवेशद्वार, सभामंडप व आसन व्यवस्था पूर्ण होत आली आहे. याशिवाय ग्रंथदालन व कलादालनासाठी स्वतंत्र व्यवस्था असून जिल्ह्याचे सांस्कृतिक दर्शन विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून घडणार आहे.

या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिका मोनिका गजेंद्रगडकर तर स्वागताध्यक्षपद महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष  ज्योती ठाकरे भूषविणार आहेत. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, ज्येष्ठ अभिनेत्री लेखिका मधुरा वेलणकर, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्ष नमिता कीर  आदींच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा होणार आहे.

या संमेलनासाठी निमंत्रित साहित्यिकांच्या निवासाची व्यवस्था पालघर व बोईसर येथे करण्यात आली आहे. पावसाच्या दृष्टीने आवश्यक अशी दक्षता घेण्यात आली आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संमेलनाच्या ठिकाणी  मुखपट्टी वापरणे सक्तीचे केले आहे. संमेलनाच्या सांगता समारंभाला खासदार सुप्रिया सुळे, लेखिका अभिनेत्री निशिगंधा वाड, ज्येष्ठ कवयित्री नीरजा उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांतर्फे सांगण्यात आले आहे. याच बरोबर या प्रसंगी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पुरस्काराचा वितरण सोहळाही होणार आहे.

कार्यक्रमांची रेलचेल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘आजची आत्मनिर्भर स्त्री’ या विषयावर अनुभव कथानाचे सत्र होणार आहे. त्यानंतर ‘स्त्री साहित्याच्या बदलत्या दिशा, बदलते भान’ या विषयावर परिसंवादाचे तर सायंकाळच्या सत्रांमध्ये काव्यसंमेलन आयोजित केले आहे. तसेच पुस्तक प्रकाशन व गुणवंत महिलांचा सन्मान समारंभही यावेळी होणार आहे.  रविवारी ‘पद्या पदन्यास’ या नृत्य आविष्कारानंतर  ‘महिलांचे राजकीय आरक्षण’ याविषयी चर्चासत्राचे आयोजन व विस्मृतीत जाणाऱ्या लोककलांना उजाळा देणाऱ्या ‘लोकरंग’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.