दुर्वेश सावरे ऐबूर -पाचूधरा रस्त्याची दुर्दशा; नागरिकांचा संताप

पालघर : मुंबई-अहमदाबाद महामार्गलगत असलेल्या दुर्वेश सावरे ऐबूर- पाचूधरा रस्त्याची दुर्दशा झाली असून नागरिकांना रस्त्यावरून प्रवास करणे त्रासाचे झाले आहे. पाच कोटी रुपये खर्च केलेला हा रस्ता पाच वर्षेही टिकला नाही. त्यामुळे नागरिकांमधून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे.

हा रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेतून चार ते पाच वर्षांंपूर्वी झाला होता. रस्ता तयार झाल्यापासून निकृष्ट कामामुळे रस्त्याला खड्डे पडले आहेत.  याच रस्त्यावर सावरे येथील एका युवकाचा दुचाकी खड्डय़ात पडल्याने अपघाती मृत्यू झाल्याची घटनाही नुकतीच घडली आहे.  त्यानंतरही प्रशासनाने या रस्त्याकडे  दुर्लक्ष केले. नागरिकांनी अनेकवेळा लोकप्रतिनिधींकडे व प्रशासनाकडे या रस्त्याच्या दुर्दशेबाबत तक्रार केली, मात्र कोणीही याकडे लक्ष दिले नाही.

रस्त्याला असणाऱ्या लहान पुलांमध्ये कमी व्यासाचे पाइप बसवल्याने डोंगरमाथ्याचे वाहून येणारे पाणी  पुलाखालून जात नाही. त्यामुळे ते रस्त्यावर साचून रस्ता दुरवस्थेत सापडला. या वर्षी याच गावातील एक महिलाही पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली होती. गावातील नागरिकांमार्फत या रस्त्यावर आंदोलन केल्यानंतर लगेच दुरुस्तीचे काम सुरू होते. मात्र त्यानंतर पुन्हा रस्त्यावर खड्डे पडतात.   देखभाल दुरुस्ती ही पाच वर्षे कायम असल्याने त्या वेळी ठेकेदारामार्फत वरचेवर दुरुस्ती केल्याचे दाखवले जात होते. मात्र आता या देखभाल-दुरुस्तीची मुदतही संपली आहे. ग्रामसडक योजनेच्या प्रशासनामार्फत  ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे काम केले जात असल्याचे आरोप या निमित्ताने होत आहेत.

समस्या सोडविण्याची सूचना

गेली अनेक वर्षे या भागात कोणीही वरिष्ठ पातळीवरील लोकप्रतिनिधी फिरकले नाही. तरी नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्षा वैदेही वाढाण यांनी मंगळवारी या गावाचा दौरा करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या वेळी संबंधित अधिकारीही सोबत  होते. तेथील नागरिकांनी सांगितलेल्या समस्या यावर तातडीने विचारविनिमय करून त्या सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी या वेळी  दिल्या.