भविष्यात तीव्र आंदोलनाचा आदिवासी एकता मित्र मंडळाचा इशारा

पालघर : पालघरचे तहसीलदार, आरोग्य विभाग आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास वनमजूर आणि मलेरिया कामगारांच्या मागण्यासाठी आदिवासी एकता मित्र मंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेला मोर्चा अखेर स्थगित केला गेला.

जिल्ह्यातील मलेरिया फवारणी कामगारांना पाचव्या, सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम द्यावी, बंद असलेली फवारणीची कामे सुरू करून रोजगार उपलब्ध करावा व वनमजुरांच्या मागण्यांमध्ये वनमजुराच्या बँक खात्यात वेतन जमा करावे, वनमजुरांना विमा संरक्षण, अधिकाऱ्यांकडून होत असलेली अरेरावी रोखावी, नियमानुसार आणि वेळेत वनमजुरांना वेतन मिळावे, वनमजुरांना जंगलात फिरण्यासाठी सुरक्षेची साधने उपलब्ध करून द्यावीत, वनमजुरांचे हजेरी पुस्तक पूर्ण भरून देण्यात यावे, एखादा कूप बंद झाला तर दुसऱ्या कुपात जुन्याच मजुरांना कामावर ठेवण्यात यावे, जुने ‘फायर वॉचमन’ असलेल्या वन मजुरांना कामावर ठेवण्यात यावे, वनमजुरांना कायम करण्यात यावे आणि आठ महिन्यांपासून थकीत वेतन वनमजुरांना तात्काळ देण्यात यावे या प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी सकाळी मनोर-पालघर रस्त्यावरील हात नदीलगतच्या मैदानातून निघालेला ‘लाँग मार्च’ पोलिसांकडून नेटाळी गावच्या हद्दीत अडविण्यात आला.

यावेळी मोर्चामध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांसोबत पोलिसांची काही काळ शाब्दिक बाचाबाची झाल्याचे सांगितले जाते. त्यानंतर आंदोलनकर्त्यांकडून मनोर-पालघर रस्त्यावरील नेटाळी गावच्या हद्दीत रस्त्यालगत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले होते.

ठिय्या आंदोलनात भाजपचे आमदार संजय केळकर आणि भाजप पदाधिकारी सहभागी झाले होते. प्रशासनाच्या अधिकारी वर्गाने येऊन आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित केले गेले. मात्र पुढे मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन उभारले जाईल, असे मंडळातर्फे संतोष जनाठे यांनी म्हटले आहे.