सफाळे ते पालघरदरम्यान वाहनचालक, प्रवाशांची गैरसोय
पालघर : दिल्ली ते जेएनपीटीदरम्यान मालवाहतुकीसाठी उभारण्यात येणाऱ्या समर्पित द्रुतगती रेल्वेमार्गाच्या उभारणीदरम्यान मातीचा भराव व खडीकरणाचे काम सुरू असून गौण खनिज वाहतुकीमुळे सफाळे ते पालघरदरम्यानचे अनेक अंतर्गत रस्ते फुटून उखडून गेले आहेत. यामुळे नागरिकांना मोठय़ा गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
अस्तित्वात असलेल्या पश्चिम रेल्वेच्या रुळांच्या पूर्वेच्या बाजूला समर्पित मालवाहू रेल्वेमार्गाची आखणी करण्यात आली असून या प्रकल्पासाठी जिल्ह्यातील भूसंपादन जवळपास पूर्ण झाले आहे. अनेक ठिकाणी मुरूम-मातीचा भराव करणे व त्याचे सपाटीकरण करण्याचे काम संपत आले असून पालघर ते केळवे रोडदरम्यानच्या भागात या मार्गावर खडीकरण हाती घेण्यात आले आहे. रेल्वे ट्रॅकसाठी वापरण्यात येणारी खडी ४० जणांच्या अवजड वाहनांमधून आणली जात असून त्यामुळे अंतर्गत रस्ते तसेच जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवर अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे परिणाम झाला आहे.
यापैकी अधिकतर रस्ते जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येत असून जिल्हा परिषदेने या रस्त्यांच्या पुनर्बांधणीसाठी डीएफसीसी (डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन) कडून निधीची मागणी केली आहे. मात्र या मागणीला डीएफसीसीकडून अजूनपर्यंत प्रतिसाद मिळत नसल्याने नागरिकांना हलाखीच्या परिस्थितीत प्रवास करावा लागत आहे. यासंदर्भात स्थानिकांनी लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास ही बाब आणून दिली असली तरी गेल्या काही महिन्यांपासून याबाबत कोणताही निर्णय किंवा दुरुस्तीसाठी हालचाल झाली नसल्याचे सांगण्यात येते.
या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा प्रशासन यांच्याशी संपर्क साधला असता नुकसान झालेल्या त्यांच्या पुनर्बांधणीसाठी तसेच दुरुस्तीसाठी द्रुतगती रेल्वे मालवाहू मालकाकडून निधीची मागणी करण्यात येईल, असे सांगण्यात आले.
सफाळे-केळवे रोडची दुर्दशा
सफाळे ते केळवे रोडदरम्यानचा रस्ता जवळपास पूर्णत: उखडून गेला असून केळवे रोड ते चौकी पाडा या रस्त्याची देखील दुर्दशा झाली आहे. त्याचबरोबर केळवा बीएसएनएल इमारत ते केळवे रोड स्टेशनदरम्यान भरणेपाडा व धवांगपाडादरम्यानच्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून याच मार्गावरील पुलालगतचा भाग अवजड वाहनांमुळे दबल्याने वाहनांना पुलावर चढताना झटका बसत आहे. पालघरपासून केळवे रोडदरम्यान रेल्वे रुळाच्या समांतर असणाऱ्या रस्त्यावरदेखील अशा अवजड वाहनांचा परिणाम झाला असून रस्त्यावरील डांबर थर फुटून जाणे, रस्त्याला खड्डे पडणे तसेच वाहनांची वाहतूक झाल्यास धुळीचे साम्राज्य पसरले अशा परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.