मनोरच्या कचराभूमीचा प्रश्न गंभीर

पालघर: मनोर ग्रामपंचायत हद्दीमध्ये कचराभूमीचा प्रश्न गंभीर बनला आहे. गावात जमा होणारा दररोजचा शेकडो टन प्लॅस्टिकसदृश कचरा गावाच्या वेशीवरील हातनदी पात्रात टाकला जात असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. स्वच्छतेचा नारा देणारी मनोर ग्रामपंचायत या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे.

मनोर ग्रामपंचायत हद्दीमध्ये ग्रामपंचायतीची स्वत:ची अनेक ठिकाणी जागा आहे. असे असताना पालघर-मनोर मुख्य रस्त्यावर हात नदीपात्राच्या स्मशानभूमी शेजारील परिसरात मोठय़ा प्रमाणात कचरा टाकला जात आहे. यामुळे या नदीपात्र भागाला कचराभूमीचे स्वरूप आले आहे.

स्वच्छता अभियानांतर्गत गावात स्वच्छता मोहीम राबवली जात असली तरी दुसरीकडे या स्वच्छतेच्या नावाखाली ग्रामपंचायतीमार्फत पर्यावरणाचा ऱ्हास सुरू असल्याचे आरोप नागरिक करीत आहेत. गेल्या अनेक वर्षांंपासून कचराभूमीचा प्रश्न प्रलंबित असला तरी त्याकडे जातीने लक्ष दिले जात नाही. सुरुवातीला हात नदीपात्राच्या ठिकाणी कचरा टाकला जात होता व त्यानंतर आतापर्यंत संपूर्ण गावाचा कचरा त्याच ठिकाणी आणून नदीपात्र विद्रूप करण्याचे काम ग्रामपंचायत प्रशासन करत आहे.

गेल्या अनेक वर्षांंपासून दररोज हजारो किलो कचरा नदीपात्रात म्हणून फेकून दिल्यामुळे कचऱ्याचे अनेक थर व ढिगारे निर्माण झाले आहेत. त्यामुळे नदीच्या पात्राचे विद्रुपीकरण झाले आहे. याच कचरा भूमीमुळे लगतच्या स्मशानभूमीत नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी गैरसोय होत आहे. गेल्या अनेक वर्षांंपासून हा प्रकार सुरू आहे. अनेक पर्यावरणप्रेमी तसेच ग्रामपंचायतीच्या नागरिकांनी हा मुद्दा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये अनेक वेळा मांडल्यानंतरही ग्रामपंचायत या विषयाकडे  दुर्लक्ष करताना दिसत आहे.

जिल्ह्यतील ४७५ गावांमध्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा व प्रकल्प कार्यान्वित केली आहे. मोठय़ा लोकसंख्येच्या गावांसाठीही असे प्रकल्प राबविण्यासाठी शासनाचे मार्गदर्शन घेऊन ते मार्गी लावण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरच हे प्रश्न मार्गी लागतील, ही आशा आहे.

तुषार माळी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत,जि.प.पालघर

ग्रामसभेत केवळ चर्चा

अनेक ग्रामसभांमध्ये ग्रामसभेच्या सुरुवातीलाच कचरा भूमीचा प्रश्न प्रकर्षांने उपस्थित करण्यात येतो. त्यावर चचा होते परंतु  त्यावर प्रत्यक्षात कोणतीही अंमलबजावणी होत नसल्यामुळे हा प्रश्न दरवर्षी प्रलंबितच राहत आहे.