नगर परिषदेच्या नियोजनशून्य व्यवस्थापनाचा फटका

पालघर : पालघर नगर परिषदेच्या नियोजनशून्य  व्यवस्थापनाच्या कारभारामुळे पालघर  शहर यंदाही पाण्याखाली जाणार आहे. पहिल्याच पावसात त्याचा प्रत्यय आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.  पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे दरवर्षी पावसात जलमय झालेल्या शहरातून वाट काढताना नागरिकांच्या नाकीनऊ येत आहे.

पालघर नगर परिषद हद्दीत सांडपाणी व्यवस्थापनासाठी दरवर्षी कोटय़वधी रुपयांचा खर्च केला जातो. गटार सफाई, गटार बांधणी, बंदिस्त गटार अशा विविध कामांचा यामध्ये समावेश असला तरी नियोजन नसल्यामुळे सांडपाणी व्यवस्थापनाचे तीन-तेरा वाजल्याचे दिसून येत आहे. सांडपाणी व्यवस्थापनासाठी प्रशासनाने व पदाधिकाऱ्यांनी मर्जीतल्या ठेकेदारांना कामे दिली आहेत. त्यामुळे तकलादू कामे करून नगर परिषदेच्या निधीचा दुरुपयोग सुरू  असल्याचे आरोप नगर परिषदेचे काही नगरसेवक करत आहेत. या कामांच्या ठिकाणी प्रशासनाच्या अभियंत्यांची देखरेख नसल्याने मनमर्जीप्रमाणे ही कामे झाली आहेत. इतकेच नव्हे तर नगर परिषदेचे नगरसेवकच ठेकेदार बनले असल्याचेही काहींचे म्हणणे आहे. पालघर नगर परिषद क्षेत्रात पावसाळ्यापूर्वी सांडपाणी व्यवस्थापनसंदर्भात गटारे साफ करणे, गटारातील गाळ काढणे, नव्याने गटारे बनवणे अशी विविध कामे हाती घेतली होती. मात्र ही कामे दर्जाहीन झाल्याने  पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे डांबरी, काँक्रिटीकरण केलेले रस्ते दुरावस्थेत सापडले आहेत. एवढा निधी खर्च करून काय उपयोग, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

पालघर नगर परिषद क्षेत्रातील लोकमान्यनगर, कमला पार्क परिसर, आर्यन शाळा परिसर, भूमी अभिलेख कार्यालय परिसर, पालघर माहीम रस्त्यावरील शब्बीर चिकन शॉपजवळ, तर पालघर माहीम रस्त्यावरील राम मंदिरासमोर, आयसीआयसीआय बँकेची गल्ली, जिल्हा परिषद पदाधिकारी कार्यालयाच्या बाजूला, मिडल क्लास सोसायटी गोठणपाडा अशा अनेक परिसरात सांडपाणी निचऱ्याची योग्य व्यवस्था नसल्यामुळे संपूर्ण पाणी रस्त्यावर वाहत आहे. काही ठिकाणी तर गटारच बनवलेले नाहीत. यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर साचून रस्त्यांना गटाराचे स्वरूप आले आहे. परिणामी, पादचाऱ्यांना चालणे जिकिरीचे होऊन बसले आहे. शहरातील देवी सहाय रस्त्यावर व लोकमान्य पाडा परिसरात पाण्याचा मोठा पूरच पाहायला मिळाला. या परिसरात असलेल्या काही गाळ्यांमध्ये पाणी शिरल्याचे पाहावयास मिळाले. तर नागरिकांना तीन फूट पाण्यातून वाट काढत जावे लागत होते. पालघर नगर परिषद क्षेत्रातील रस्त्यालगत बांधलेली गटारे ही रस्त्यापेक्षा उंच असल्याने रस्त्याच्या पाण्याचा निचरा होत नाही. याउलट या गटारात पाणी जाण्यासाठी केलेल्या जागेतून गटाराचे पाणी रस्त्यावर येऊन सर्वत्र घाण पसरत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यालाही मोठा धोका उद्भवत आहे. कोटय़वधीचा निधी खर्चून सांडपाणी व्यवस्थापनाचे काम नीट होत नसेल तर जबाबदार ठेकेदार अधिकारी यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे.

सांडपाणी व्यवस्थापनाचे योग्य नियोजन न केल्यामुळे सर्व रस्ते पाण्याखाली गेले आहे. कोटय़वधीचा निधी खर्च केल्यानंतरही योग्य नियोजन होत नसेल तर कारवाई झालीच पाहिजे.

-कैलास म्हात्रे, गटनेता, पालघर नगर परिषद

प्रत्येक ठिकाणी भेटी देऊन आरोग्य विभागाच्या समन्वयाने पाण्याच्या निचऱ्याबाबतची कामे करण्यात आली आहेत.

-प्रशांत पवार, नगर अभियंता, पालघर नगर परिषद