सुरक्षेविना महामार्ग ‘भरधाव’

पालघर जिल्ह्याच्या मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हद्दीमध्ये गेल्या वर्षभरापासून वाहनांना अपघातांतर्गत आगी लागण्याच्या घटना घडत आहेत.

वाहनांना आगी लागण्याच्या घटना; प्राधिकरणाचे दुर्लक्ष

निखील मेस्त्री
पालघर : पालघर जिल्ह्याच्या मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हद्दीमध्ये गेल्या वर्षभरापासून वाहनांना अपघातांतर्गत आगी लागण्याच्या घटना घडत आहेत. महामार्गावर अग्निशमन यंत्रणांसह अनेक सुरक्षा सुविधांची वानवा असल्यामुळे या घटनांमध्ये वाहनचालक, प्रवाशांना मृत्यूला सामोरे जावे लागत आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत असून हा महामार्ग वाहनांसाठी धोकादायक ठरत आहे.

महामार्गावर फाऊंटन हॉटेलच्या ठाणे हद्दीपासून ते तलासरीतील आच्छाड नाका असा वर्दळीचा महामार्ग पालघर जिल्ह्याच्या हद्दीत आहे. पालघर जिल्ह्यासह गुजरात राज्यामध्ये या महामार्गाच्या आजूबाजूला रासायनिक व इतर औद्योगिक वसाहती आहेत. या औद्योगिक वसाहतीतून मोठय़ा प्रमाणात ज्वलनशील रसायन महामार्गाद्वारे इतरत्र पाठवले जाते. याचबरोबरीने इंधन टँकर, घरगुती गॅस सिलिंडर, ज्वलनशील पदार्थ अशी धोकादायक वाहने या महामार्गावरून दररोज मोठय़ा प्रमाणात ये-जा करीत असतात. महामार्गावर ठिकठिकाणी पेट्रोल पंपही आहेत. काहीवेळा अपघातात वाहनांना आग लागण्याच्या घटना घडतात. घटना घडल्यानंतर वेळीच त्यावर नियंत्रण मिळवणाऱ्या अग्निशमन यंत्रणेचा अभाव तसेच रुग्णवाहिका, प्राथमिक उपचारासह इतर तातडीने मदत मिळत नसल्यामुळे वाहने जळून खाक होत आहेत. त्यात काहीवेळा जखमी वाहनचालक, प्रवाशांचे नाहक बळी जात आहेत. अपघात घडल्यानंतर वाहतूक कोंडी होऊन महामार्गावर चार ते पाच किलोमीटर लांबीच्या रांगा लागून वाहतुकीचा खोळंबा होत आहे. सुरक्षा यंत्रणेअभावी पोलीसही हतबल होत आहेत.

महामार्ग प्राधिकरणामार्फत पालघर जिल्ह्याच्या हद्दीत तीन केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. तरी या केंद्रांवर अपघातप्रसंगी मदतकार्य व बचावकार्य करण्यायोग्य यंत्रणाच तैनात करण्यात आलेली नाही. महामार्ग देखभाल दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदारांनी तशी यंत्रणा न उभारल्यामुळे महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला आहे.  बऱ्याच ठिकाणी दिशादर्शक फलकही लावले गेलेले नाहीत. त्यामुळे वाहनांना रस्त्यांची दिशा व अपघात क्षेत्र समजण्यात अडचणी येत आहेत.

वर्षभरात महामार्गावर वाहनांना आठ ते दहा घटनांमध्ये आगी लागल्याच्या घटना घडल्या. या घटना घडल्या नंतर बोईसर पालघर, वसई या ठिकाणाहून अग्निशमन दलाला पाचारण करावे लागते. मात्र अपघात घडल्यानंतर वाहतूक कोंडी होऊन वाहतुकीच्या रांगाच रांगा लागल्यामुळे या यंत्रणांना घटनेपर्यंत पोहचण्यासाठी उशीर होतो. महामार्गालगत असलेल्या गावातील नागरिकांनाही अशा घटनांमुळे धोका निर्माण झाला आहे. महामार्गावर असलेले पेट्रोल पंप हॉटेल धाबे यांच्याकडे अग्निरोधक यंत्रणा असणे अपेक्षित आहे, मात्र तशी यंत्रणा कुठेही दिसून येत नाही, असे सांगितले जाते.

घडलेल्या घटना

  • २०१९ मध्ये आवढनी गावाच्या हद्दीत गॅस सिलेंडर वाहून नेत असलेल्या ट्रकचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला.
  • २०२०च्या सुरुवातीला गवत वाहून नेणारा ट्रक किल्ला फाटाजवळ जळून खाक झाला.
  • २ मे रोजी चिल्हार आवढणी येथे एका ट्रकने अचानक पेट घेतला. यात जीवितहानी नसली तरी ट्रक खाक झाला.
  • ७ जून रोजी शिरसाट फाटा येथे टँकर आगीच्या घटनेत एकाचा मृत्यू झाला होता.
  • ६ जानेवारी रोजी सकवार येथील तीन वाहनांची ठोकर होऊन मोठी आग लागली. यात जीवितहानी नसली तरी पहाटेच्या वेळेस अग्निशमन मदतकार्य पोचले नसल्याने तिन्ही वाहने खाक झाली.
  • १७ फेब्रुवारी रोजी मनोर वाडा रस्त्यावर ब्रेक घासून वाहनाला पेट घेतला. मदत न पोचल्याने वाहन पूर्णपणे जळून गेले.
  • ७ जून रोजी हालोली बोट रस्त्यावर ज्वलनशील रसायनाने भरलेल्या टँकरला आग लागली. या वेळी आजूबाजूच्या गावांना धोका निर्माण झाला होता.
  • ३ जून रोजी मनोर येथे वाहनाला अचानक आग लागली व त्यात वाहन जाळून खाक झाले.
  • ढेकाळे परिसरात दोन वाहनांत झालेल्या अपघातात वाहनाला आग लागली व त्यात मुलगा व वडील जळून त्यांचा मृत्यू झाला.

महामार्गावर अग्निशमन यंत्रणेसह सुरक्षा यंत्रणा तैनात करावी अशा सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या होत्या. त्यानंतरही त्याची पूर्तता झालेली नाही. यासाठी येत्या दहा-पंधरा दिवसांत संयुक्त बैठक आयोजित करून त्यांना सुरक्षेबाबतच्या यंत्रणा उभारण्यासाठी सक्तीची ताकीद दिली जाईल.

– राजेंद्र गावित, खासदार

प्रत्येक टोलनाक्यावर रुग्णवाहिका तैनात आहे. अग्निशमन  यंत्रणा ठेवण्याची तरतूद आमच्या प्राधिकरण नियमात नाही. महामार्ग सुरक्षेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

– विमलेश गोस्वामी, अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पालघर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Highway without safety palghar mumbai ahmedabad national highway ssh

Next Story
नैसर्गिक नाला बुजविल्याने गालतरे रस्त्याला धोका
ताज्या बातम्या