नियमांचे पालन करत देवीचे दर्शन

कासा :  करोनाचा संसर्ग कमी झाल्याने  घटस्थापनेच्या मुहूर्तावर मंदिरे खुले करण्यास सरकारने परवानगी दिल्यानंतर गुरुवारपासून  मंदिर भाविकांसाठी खुली झाली आहेत.  या पार्श्वभूमीवर डहाणूतील महालक्ष्मी मंदिर खुले होताच नियमांचे पालन करत भाविकांनी रांगा लावून देवीचे दर्शन घेतले.  शासनाने अनेक निर्बंध लावून  मंदिर खुली करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार महालक्ष्मी मंदिर ट्रस्टकडून आवश्यक  तयारी  केली असून भाविकांसाठी सर्व मंदिर परिसरात सूचना फलक लावले आहेत. सॅनिटाइझर, थर्मल स्कीनिंग आधी सुविधा उपलब्ध केल्या असून दर्शन रांगेत सहा फूट अंतर ठेवले आहे. नवरात्र उत्सव दरम्यान येणारी भाविकांची संख्या लक्षात घेऊन सुरक्षा रक्षक यांची संख्या वाढविण्यात आली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे मंदिर परिसरात लावण्यात आले आहेत .  दर्शनव्यवस्था सुरळीत करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या गेल्या आहेत.  दरम्यान नवरात्रीचा पहिल्या दिवस असल्याने सकाळी भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली होती.