पालघर / वसई : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पालघर, प्राथमिक शिक्षण विभाग व प्रथम संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये शाळापूर्व तयारी मेळावा मंगळवारी उत्साहात पार पडला. मेळाव्यात जिल्ह्यातील सुमारे एक हजार ७७६ शाळांनी सहभाग घेतला.
करोनाच्या पार्श्वभूमी वर मागील दोन वर्षांपासून अंगणवाडय़ा, बालवाडय़ा बंद असल्याने बालकांना शाळा पूर्वतयारी कृतीची संधी मिळाली नाही. त्यामुळे बालकांची अपेक्षित शाळा पूर्वतयारी व्हावी व त्याआधारे दाखलपात्र बालकांचे पहिलीच्या वर्गात सहज संक्रमण घडून यावे याकरिता ‘शाळा पूर्वतयारी मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. जूनमध्ये इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे मेळावे होते. डहाणू, वाडा, तलासरी, विक्रमगड, जव्हार तसेच वसई तालुक्यातील शाळांचा सहभाग होता. तालुक्यांतील गावामध्ये प्रभातफेरी काढून मुलांनी ढोल, लेझीमच्या तालावर तसेच घोषणा देऊन एक शैक्षणिक वातावरण निर्माण केले होते. विविध दालने उभारून त्याद्वारे बालकांचा सर्वागीण विकास कसा होईल यावर मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दह्याळे व धांगडपाडा या दोन शाळांनी एकत्रितरीत्या मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्याला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. डहाणू तालुक्यातील कोल्हान केंद्राअंतर्गत येणाऱ्या सोळा शाळांतही हा मेळावा पार पडला. यावेळी अभ्यास पुस्तिका वाटण्यात आल्या. पालकांना शाळापूर्व तयारीमध्ये त्यांची भूमिका स्पष्ट करून सांगण्यात आली.
वसईतील १९३ शाळांत विविध उपक्रम
वसई : वसई विरारच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शाळास्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. वसईतील १९३ जिल्हा परिषदेच्या शाळेत विविध उपक्रम राबविण्यात आले होते. या वेळी विद्यार्थ्यांचा विविधअंगी विकास, बौद्धिक विकास, कलागुण तसेच यामध्ये पालकांचा सहभाग याविषयी माहिती देणारे दालने उभारण्यात आली होती. शाळेमध्ये नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना प्रत्येक दालनावर नेऊन नोंदणी कक्ष, शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक व भावनिक विकास, भाषा विकास व गणनपूर्व तयारी इत्यादींबाबत विविध कृती व प्रात्यक्षिके करून माहिती देण्यात आली, असे वसई तालुका शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.