सव्‍‌र्हेक्षण नसल्यामुळे हजारो गोरगरीब कुटुंबे शासनाच्या मोफत योजनांपासून दूर

रमेश पाटील

वाडा:  गेल्या १५ वर्षांपासून दारिद्रय़रेषेखालील कुटुंबांचा सव्‍‌र्हे झाला नसल्याने पालघर जिल्ह्यतील आदिवासी ग्रामीण आणि दुर्गम भागात अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत. पंधरा वर्षांपूर्वीच्या दारिद्रय़रेषेखालील यादीत नावे नसल्याने शासनाच्या अनेक योजनांचा लाभ या कुटुंबांना घेता आलेला नाही. मात्र, यादीतील काही कुटुंबे आज सधन झाली असून ते शासनाच्या योजनांचा लाभ घेत आहेत. 

शासनाकडून सन २००७ मध्ये  झालेल्या सव्‍‌र्हेत  वाडा, जव्हार, विक्रमगड, मोखाडा या चार तालुक्यांत ६५ हजारांहून अधिक कुटुंबे दारिद्रय़रेषेखालील यादीत होती. गेल्या १५ वर्षांत या कुटुंबातील अनेक कुटुंबे सधन झाली आहेत. 

 जिल्ह्यत  दारिद्रय़रेषेखालील यादीत नाव नसलेल्या कुटुंबांची संख्या १५ हजारांहून अधिक असल्याचे सांगितले जाते.  जव्हार तालुक्यात  सुमारे एक लाख चाळीस हजार कुटुंब सदस्य हे लाभार्थींच्या यादीत आहेत.  तालुक्यात ३१३२८ शिधापत्रिकाधारक असून यामध्ये १ लाख ४० हजार कुटुंब सदस्यांचा समावेश आहे. तालुक्यात १२०२ शुभ्र शिधापत्रिकाधारक असून यामध्ये ५९०८ कुटुंबीय सदस्यांचा समावेश आहे.  यादीत नाव नसल्याने येथील अत्यंत हलाखीचे जीवन जगणाऱ्या ३७२८ कुटुंबीयांचे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत नाव समाविष्ट न झाल्याने त्यांना शासनाच्या मोफत योजनांचा लाभ मिळत नाही. विक्रमगड तालुक्यात ३३७८१ शिधापत्रिकाधारक कुटुंबे असून १ लाख ७२ हजार ९७० कुटुंब सदस्यांचा समावेश आहे.   १६२१९ कुटुंबे दारिद्रय़रेषेखालील यादीत समाविष्ट आहेत. या कुटुंबातील ८९५३७ सदस्यांना  योजनांचा लाभ मिळत आहे.   वाडा तालुक्यात  यादीत असलेल्या कुटुंबांची संख्या १६९७६ इतकी आहे.  योजनांपासून वंचित राहिलेल्या गरीब कुटुंबांची संख्या १० हजारांहून अधिक आहे.  यादीची पडताळणी करण्याची गरज भासत आहे, असे  भुमीसेना आदिवासी एकता परिषदेचे पालघर जिल्हा कोषाध्यक्ष भास्कर दळवी यांनी सांगितले.

धनिकांची नावे दारिद्रयरेषेच्या यादीत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सन २००७ मध्ये तयार करण्यात आलेल्या दारिद्रय़रेषेखालील यादीत समाविष्ट असलेले काही लाभार्थी हे आज आयकर भरणारे आहेत. त्यामध्ये राजकीय पुढारी, व्यापारी, ठेकेदार, संस्थांचे सभासद, संस्थांचे पदाधिकारी, काही धनिक यांचादेखील समावेश आहे. विशेष म्हणजे काही लाभधारकांकडे चारचाकी व दुचाकी वाहने असून त्यांनी करोनाकाळात शासनाने वाटप केलेल्या मोफत धान्याचा लाभ घेतला असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.