विजय राऊत

कासा : विक्रमगड  पालघर जिल्ह्यतील आदिवासी भागातील एक मुख्य तालुक्याचे तसेच आठवडी बाजाराचे  ठिकाण असल्याने दर बुधवारी येथे बाजार भरतो. तालुक्यातील ४५ ते  ५० गावांतील शेतकरी आपला शेतातील माल विकण्यासाठी मोठय़ा संख्येने बाजारात येत असतात. परंतु  नियोजन नसल्यामुळे  येथे वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

बाजारात कपडे, चप्पल व लहान-मोठय़ा प्लास्टिक इलेक्ट्रॉनिक वस्तू फळभाज्या, सुकी मासळी आदींची विक्री मोठय़ा प्रमाणात येथे होत असतो. विक्रेते आपले दुकान रस्त्याच्या कडेला लावतात.  दिवसेंदिवस या बाजाराची व्याप्ती वाढत असून शेतकऱ्यांना माल विक्रीसाठी जागा अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे  काही शेतकरी त्यांच्या मालाच्या विक्रीसाठी रस्त्यावर बसत आहेत. या दिवशी विक्रमगड-वाडा, विक्रमगड-जव्हार, विक्रमगड-डहाणू या सर्व  रस्त्यावर बाजार भरत असल्याने प्रचंड वाहतूक कोंडी होते. अनेकवेळा तासन्तास रहदारीस अडथळा निर्माण होत असतो. बस स्थानकलाही स्वतंत्र जागा नसल्याने बस रस्त्यावरच थांबतात  बऱ्याचदा रुग्णवाहिका, बस यांनाही रस्ता मिळत नसल्याने बसच्या प्रवाशांचाही प्रवासात जास्त वेळ जातो तसेच रुग्णवाहिकेलाही विलंब होतो. वाहतुकीची गर्दी झाल्यानंतर वाहतुकीचे नियम न पाळता मोटारसायकलचालक रस्ता मिळेल त्याप्रमाणे विरुद्ध दिशेनेही गाडय़ा काढत असल्याने बऱ्याचदा ट्रकचालक, दुचाकीचालक व पायी चालणारे प्रवासी यांच्यामध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळते. बसस्थानक परिसर, डहाणू रोड, जव्हार रोड, वाडा रोड याठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. या समस्येकडे पोलीस प्रशासन व नगर पंचायत मोठय़ा प्रमाणावर दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विक्रमगडमध्ये दर बुधवारी आठवडी बाजारात रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होते. दुचाकीवरूनही गावातून जाण्यासाठीसुद्धा अर्धा तास वेळ लागतो, तरी नगरपंचायत तसेच पोलीस प्रशासन यांनी यावर काहीतरी तोडगा काढून ही समस्या दूर करावी.

भूषण महाले, ग्रामस्थ