लसमात्रांचा वापर कोठे झाला याची नोंदच नाही

पालघर: पालघर जिल्ह्यात उपलब्ध  झालेल्या लशींच्या साठय़ातून पाच टक्के अतिरिक्त लसीकरण झाल्याचा टेंभा प्रशासनाच्या वतीने मिरवला जात आहे. परंतु दुसरीकडे प्रत्यक्षात १० ते १५ टक्के उपलब्ध झालेल्या अतिरिक्त लस मात्रांचा वापर कुठे करण्यात आला असा प्रश्न लसीकरण करणाऱ्या परिचारिकांकडूनच उपस्थित करण्यात आल्यामुळे  त्याबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पालघर जिल्ह्यात प्राप्त झालेल्या लस साठय़ामधून सुमारे ८८ हजार अतिरिक्त लसीकरण झाल्याची माहिती आहे. त्याचे प्रमाण पाच टक्कय़ांच्या जवळपास आहे. लसीकरण करणाऱ्या परिचारिकांनी  जबाबदारीने काम केल्यानंतर प्रत्येक लस कुपीमधून अकरा ते साडेअकरा व वेळेप्रसंगी १२ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यतील लस बचतीचे प्रमाण १० ते १५ टक्के किमान असायला हवे होते. परंतु तेवढे नसल्यामुळे यामध्ये काहीतरी गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. 

लसीकरण केंद्रात उपलब्ध होणाऱ्या अतिरिक्त साठय़ाचा वैद्यकीय अधिकारी यांचा मित्रपरिवार, आप्तेष्ट व प्रतिष्ठित व्यक्तींकरिता वापर केला जात असल्याचे आरोप पालघरमध्ये सुरुवातीपासून झाले होते. त्याचप्रमाणे या अतिरिक्त होणाऱ्या कुप्यामधून औद्योगिक परिसरात उद्योगांकडून आर्थिक मोबदला घेऊन कामगारांचे लसीकरण होत असल्याचे अनेकदा आरोप झाले होते. यापैकी तारापूरमध्ये एका प्रकरणात घोलवड येथील वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत लसीकरण सुरू असल्याची तक्रार पुढे आली होती तसेच तारापूर परिसरातील काही नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन लसीकरण केल्याचेदेखील प्रकार पुढे आले होते.

मुळात लससाठा उपलब्ध झाल्यानंतर प्राप्त झालेल्या लस कुप्या तसेच लसीकरण झाल्यानंतर वापरलेल्या कुप्या यांचे लेखापरीक्षण आवश्यक होते. मात्र अशा वापरलेल्या लशींच्या कुप्यांची विल्हेवाट लावण्यासाठी आरोग्य यंत्रणा तत्पर व उत्सुक असल्याचे दिसून आले. त्यामुळे लसीकरणाचा ताळेबंद  होऊ शकला नाही. राज्यात लस वापरात पालघर जिल्हा दुसऱ्या क्रमांकाने सरस असला तरीही औद्योगिक क्षेत्रात विशिष्ट रकमेची आकारणी करून दिलेल्या लसीकरणातील धागेदोरे शोधण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या मर्यादा पुढे आल्या आहेत, असे दिसून येत आहे.

दरम्यान तारापूर औद्योगिक वसाहतीमधील एका नामांकित उद्योगाचा घोलवड प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत लसीकरण सुरू असल्याचे रंगेहाथ पकडले

होते. त्याबाबत तक्रारीही करण्यात आल्या होत्या. घटना उघडकीस आल्यानंतर दोन दिवसानंतर त्याची तपासणी करण्यासाठी पथक उद्योगात पोहोचले होते. दरम्यानच्या काळात लसीकरण केलेल्या कुप्याची विल्हेवाट लावल्यामुळे त्याचा तपशील उपलब्ध होऊ शकला नाही. त्याशिवाय या उद्योगाने कंपनीच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेज देण्यास प्रथम नकार दिला व नंतर कॅमेरा बंद असल्याचे कारण तपास यंत्रणेला सांगितल्याची माहिती देण्यात येते.

या उद्योगात अपंग कर्मचाऱ्याचा महत्त्वपूर्ण सहभाग निदर्शनास आला आहे. करोना काळात अपंग कर्मचाऱ्यांना दिलेल्या सवलतीच्या आधारे वर्षभर ते कामावर हजर नसल्याची माहिती देखील प्राप्त झाली आहे. राजकीय दबावामुळे जिल्हा प्रशासन या प्रकरणातील दोषींविरुद्ध कारवाई करण्यास धाडस करीत नसल्याचे येथे सांगण्यात येते.

आरोग्य यंत्रणेचे मौन

पालघर तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयात छुप्या पद्धतीने लसीकरण सुरू असण्याबाबत पालघरच्या नगरसेवकांनी तक्रार नोंदविल्यानंतर ते सत्र आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांसाठी आयोजित केल्याचे सांगून या विषयावर पडदा टाकण्यात आला होता. मात्र त्या ठिकाणी सापडलेल्या नोंदवहीत यापूर्वी झालेल्या प्रतिष्ठित व्यक्तींचे व राजकीय पुढाऱ्यांच्या छुप्या पद्धतीने लसीकरण केल्याबाबत आरोग्य यंत्रणेने अजूनही मौन पाळले आहे.

कारवाईची प्रक्रिया सुरू – आरोग्य अधिकारी

तारापूर उद्योगातील गैरप्रकार सुरू असणाऱ्या लसीकरणाबाबत संबंधित आरोग्य अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याची शिफारस जिल्हा प्रशासनाने आरोग्य संचालनालयाकडे केली असून संबंधितांविरुद्ध कारवाई होण्याची अजूनही प्रतीक्षा आहे. या संदर्भात अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता तारापूर येथील एका उद्योगात जिल्हा आरोग्य विभागातील काही अधिकारी- कर्मचारी यांनी लसीकरण केल्याचे पुरावे प्राप्त झाले असून संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे ‘लोकसत्ता’ला सांगितले.