पालघर शहरातील मोबाइल मनोरे अनधिकृत

पालघर शहरात असणाऱ्या २७ मोबाइल मनोऱ्यांपैकी (टॉवर) एकाही मोबाइल मनोऱ्याची संबंधित मोबाइल सेवा पुरवठादाराने नगर परिषदेकडून रितसर परवानगी घेतली असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

नगर परिषद हद्दीत २७ मोबाइल मनोरे

पालघर : पालघर शहरात असणाऱ्या २७ मोबाइल मनोऱ्यांपैकी (टॉवर) एकाही मोबाइल मनोऱ्याची संबंधित मोबाइल सेवा पुरवठादाराने नगर परिषदेकडून रितसर परवानगी घेतली असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे २०१८ सालापासून वेवूळ येथील गावठाण जागेत उभारल्या जाणाऱ्या एका मनोऱ्याला ग्रामस्थांनी कडाडून आणि सातत्याने विरोध केल्यानंतरही त्याच्याविरुद्ध नगर परिषदेने निकाल देऊनही त्या मनोऱ्याबाबत कारवाई करण्यात नगर परिषदेला अपयश आले आहे.

पालघर नगर परिषद हद्दीमध्ये २७ मोबाइल मनोरा विविध ठिकाणी बसविण्यात आले असून त्यापैकी अनेक मनोरा खासगी जमिनीत, इमारतींच्या वर तसेच सरकारी किंवा गावठाण जागेवर उभारले गेले आहेत. पालघर जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यतील सर्व मोबाइल मनोरे नियमित करण्याबाबत जानेवारी २०२१ मध्येच संबंधित अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्या होत्या. मात्र पालघर नगर परिषदेने शहरात उभारण्यात आलेल्या मनोऱ्यांचे अद्याप साधे सर्वेक्षणदेखील पूर्ण करण्यात आले नसल्याचे दिसून आले आहे.

यासंदर्भात पालघर नगर परिषदेचे मुख्याधिकारी स्वाती देशपांडे यांच्याशी संपर्क साधला असता नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना सर्व मोबाइल मनोऱ्यांची माहिती संकलन करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून मनोऱ्याच्या ठिकाणी जागा मालकासोबत झालेले करारपत्र, सेवा पुरवणाऱ्या कंपनीचे नाव व इतर परवानग्या याबाबतची माहिती संकलित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे असे सांगितले. येत्या आठवडाभरात संबंधित मोबाइल मनोरे कंपन्यांना नगर परिषद नोटीस बजावून पुढील कारवाई करेल, असे त्यांनी सांगितले. या मोबाइल मनोऱ्यांना अजूनही शहराच्या कर प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात आले नसल्याने नव्याने नेमलेल्या कर वसुली ठेकेदाराच्या मदतीने या सर्व मनोऱ्यांना आकारणी करण्यात येईल, असे मुख्याधिकारी यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. पालघर नगर परिषदेकडे मनुष्यबळाची मर्यादा असल्याने हे काम विलंबाने होत असल्याचे त्या म्हणाल्या.

हनुमान नगरचा मनोरा अनधिकृत, तरीही कारवाई नाही

पालघर वेवूर हनुमान नगर येथे गावठाण जागेत सन २०१८ पासून उभारण्यात येणाऱ्या मोबाइल मनोऱ्याला स्थानिकांनी किरणोत्सर्ग होण्याच्या भीतीने आरंभीपासून विरोध केला. यासंदर्भात अनेकदा पत्रव्यवहार व पाठपुरावा केल्यानंतर नगर परिषदेने हा मनोरा बेकायदा ठरवला होता. नोव्हेंबर २०१८ मध्ये हनुमान नगरचा मनोरा नियमित करण्यासाठी मोबाइल कंपनीने नगर परिषदेकडे सादर केलेल्या प्रस्तावामध्ये अनेक त्रुटी आढळल्याने तसेच हा प्रस्ताव अपूर्ण असल्याने या मनोऱ्याची सेवा स्थगित करावी व तात्काळ मनोरा दूर करावा असे आदेश नगर परिषदेने २३ सप्टेंबर २०२१ रोजी दिले होते. त्याचप्रमाणे नगर परिषदेने या मोबाइल मनोऱ्याचा विद्युत पुरवठा खंडित करण्याच्या सूचना महावितरणला पत्र दिले होते. हनुमान नगर परिसरातील किमान ४० नागरिकांनी मनोरा बंद ठेवण्यासाठी नगर परिषदेकडे स्वाक्षरीचे पत्र दिले असले तरीही नगर परिषदेच्या आदेशांना दोन महिने उलटल्यानंतर देखील नगर परिषदेने किंवा महावितरणने या मनोऱ्यामध्ये कोणतीही कारवाई केली नसल्याचे दिसून आले आहे. वेवूर येथील अनधिकृत मनोरा बंद करण्याचे नगर परिषदेने आदेश दिले असून त्याविरुद्ध लवकरच कारवाई करण्यात येईल, असे मुख्याधिकारी यांनी सांगितले. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पालघर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mobile towers city unauthorized ysh