पैसे न दिल्याने प्रमाणपत्र फाडले, डॉ. गुलाले यांचा अजब प्रताप
पालघर : सातपाटी प्राथमिक आरोग्य केंद्रातून उपचार घेतलेल्या एका रुग्णाला उपचार केल्याबाबत वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी पैशाची मागणी केल्याच्या प्रकाराची तक्रार दाखल करण्यात आली आहे. रुग्णाने पैशाची पूर्तता केली नाही म्हणून रागाने आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी डॉ. किशोर गुलाले यांनी वैद्यकीय प्रमाणपत्र तयार करून रुग्णासमोरच ते फाडल्याचा गंभीर प्रकार केला आहे.
१ जानेवारी रोजी सातपाटी येथील रहिवासी निमेत आरेकर याला दुचाकी अपघातामध्ये पायाला जखम झाली होती. त्याने सातपाटीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेतले. उपचार करून त्याला आठवडाभराचा औषधोपचार दिला व घरी आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. निमेतला कामावर रुजू होण्यासाठी आरोग्य संस्थेकडून वैद्यकीय प्रमाणपत्र घेणे आवश्यक होते. ते सादर केल्यानंतरच त्याला कामावर घेतले जाणार होते. रविवारी त्याने सातपाटी आरोग्य केंद्रात जाऊन आरोग्य अधिकारी डॉ. किशोर गूलाले यांच्याकडून वैद्यकीय प्रमाणपत्राची मागणी केली. या प्रमाणपत्राची मागणी केल्यानंतर गुलाले यांनी प्रमाणपत्र तयार करून पैशांची मागणी केली. पैशाची मागणी केल्यानंतर निमेत यांनी त्यांच्या काकांना फोनवरून संपर्क साधला आणि संबंधित डॉक्टरशी बोलण्याची विनंती केली. त्यावेळी काकांनी शासकीय शुल्क किती आहे ते सांगा म्हणजे तो तेवढी रक्कम भरेल असे सांगितले. या गोष्टीचा राग धरून संबंधित गुलाले यांनी तयार केलेले प्रमाणपत्र फाडून टाकले आणि अशी प्रमाणपत्रे द्यायला आम्ही बांधील नाहीत असे बेजबाबदार वक्तव्य केले. त्यामुळे गुलाले यांच्या बेजबाबदारपणामुळे नागरिकांशी चुकीच्या पद्धतीने वागणूक दिल्यामुळे त्यांच्या विरोधात मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी अशा ठिकाणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. सफाळे येथे गुलाले कार्यरत असताना त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी त्यांच्या वरिष्ठांकडे केल्या होत्या. त्यानंतर त्यांची बदली सातपाटी प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आली होती. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडेही तक्रार प्राप्त झाली आहे. या प्रकरणात ते गुलाले यांच्याकडून खुलासा मागवणार असल्याचे समजते. नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी नेमलेले आरोग्य अधिकारी यांनी केलेले कृत्य बेजबाबदार व अशोभनीय होते. त्यांच्यावर शासकीय सेवा हक्कभंग अंतर्गत कारवाई व्हावी अशी माझी मागणी राहिली.
निकेत आरेकर, रुग्ण, सातपाटी
संबंधित रुग्णाने सातपाटी आरोग्य केंद्रात उपचार घेतले होते मात्र त्यावर मी उपचार केले नसल्याने त्याला वैद्यकीय प्रमाणपत्र देऊ शकत नव्हतो. नजरचुकीने माझ्याकडून प्रमाणपत्र तयार झाले व मी ते फाडले.
डॉ. किशोर गुलाले, आरोग्य अधिकारी, सातपाटी प्राथमिक आरोग्य केंद्र