विस्तार अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे अभियंता, समकक्ष अधिकारी प्रशासक?

पालघर : पालघर जिल्ह्याातील ३०६ ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ जुलैअखेर संपणार आहे. करोनाकाळात ग्रामपंचायतींच्या निवडणुकांबाबत अनिश्चितता असल्याचे गृहीत धरून या ग्रामपंचायतींवर जिल्हा परिषदेमार्फत प्रशासक नेमण्याच्या प्रस्तावावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सोमवारी सह्या केल्या. यामुळे या सर्व ग्रामपंचायतींवर टप्प्याटप्प्याने प्रशासक नेमण्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे.

मुदत संपणाऱ्या या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी फेब्रुवारी महिन्यात निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या सर्व ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनांवर पालघर तहसीलदारांची मान्यता मिळाल्यानंतर ग्रामस्थांच्या हरकती आणि सूचना मागवण्याआधीच करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागला. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. जानेवारी महिन्यामध्ये ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली होती. निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचायतीच्या निवडणुकांबाबत अजूनही कार्यक्रम जाहीर करण्यात आला नाही. मात्र या ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी प्रशासक नेमणे आवश्यक झाले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत या सर्व ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोर सोमवारी सादर केला गेला. प्रशासक नेमण्याच्या या प्रस्तावाला मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे जुलै महिन्यात टप्प्याटप्प्याने मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नियमांप्रमाणे हे प्रशासक ज्येष्ठ विस्तार अधिकारी असणे आवश्यक आहे. मात्र जिल्ह्यात विस्तार अधिकारी वर्गाची संख्या कमी असल्याने त्यांच्यासह विविध शाखा अभियंता व समकक्ष वर्गाचे अधिकारी वर्ग यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली जाईल. यासाठी जिल्हा परिषदेची चाचपणी सुरू आहे.

जव्हारमध्ये प्रशासक

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात मंगळवारपासून जव्हार तालुक्यातील काही ग्रामपंचायतींची मुदत संपल्यामुळे या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता हे प्रशासनच ग्रामपंचायतींचा कारभार पाहणार आहेत.