|| विजय राऊत

चारोटी उड्डाणपुलावर वर्षभरात १०० अपघात; महामार्ग प्रशासनाकडून उपाययोजना नाही

कासा : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग दिवसेंदिवस धोकादायक होत चालला आहे.  महामार्गावरील चारोटी येथील उड्डाणपुलावर  गेल्या वर्षभरात १०० च्या आसपास अपघात झाले आहेत. तर सहा जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. पूल उभारताना त्याची रचना चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे हे अपघात होत असल्याचे कारण येथे सांगितले जात आहे. परंतु त्याबाबत कोणतीही उपाययोजना राज्य प्रशासन किंवा राष्ट्रीय महामार्ग प्रशासन करीत नसल्याने वाहनचालकांसह प्रवाशांमध्ये संताप आहे.

मुबंई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर  २०१४-१५ मध्ये या महामार्गावर चारोटी येथे होणारी वाहतूक कोंडी आणि अपघात रोखण्यासाठी साधारण एक किमी लांबीचा उड्डाणपूल बांधण्यात आला. हा पूल सुरुवातीपासूनच वाहनचालकांसाठी  धोकादायक बनला आहे.  उड्डाणपूल बांधताना गुजरातकडून येणाऱ्या मार्गिकेला ६० ते ७० अंशाच्या कोनाचे तीव्र वळण ठेवण्यात आले आहे. अहमदाबादकडून मुंबईकडे जाणारा जो महामार्ग आहे, त्याला महालक्ष्मी जवळून तीव्र उतार आहे , त्यामुळे अहमदाबादकडून येणारी वाहने अतिशय वेगात येतात , त्यातच चारोटी उड्डाणपुलाला तीव्र असे ६० ते ७० अंशाच्या कोनात वळण असल्यामुळे  चालकांना या वळणावर आपले वाहन आणतांना ते नियंत्रित करता येत नाही. त्यामुळे अपघात होतात.

शुक्रवार, १८ जून  शुक्रवार, १८ जून रोजी संध्याकाळी ७.३० वाजता,  अहमदाबादकडून मुंबईच्या दिशेने जाणारे खाद्यतेलाच्या चालकाला उड्डाणपूलाच्या तीव्र वळणाचा अंदाज आला नाही, त्यामुळे त्याचे वाहनवरील नियंत्रण सुटले व उड्डाणपुलावरच हा टँकर पलटला. वाहनचालक किरकोळ जखमी झाला. तेलाचे टँकर अपघातग्रस्त झाल्याने टँकर फुटून संपूर्ण महामार्गावर हजारो लिटर तेलाची गळती झाली. त्यामुळे चारोटी उड्डाणपुलावरील दोन्ही बाजूंनी वाहतूक समांतर रस्त्याने वळविण्यात आली होती. शुक्रवारी रात्री उशिरा  टँकर हटवण्यात आला व मुंबईकडून अहमदाबादकडे जाणारी मार्गिका सुरू करण्यात आली. अहमदाबादकडून मुबंईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर मोठ्या प्रमाणात तेल असल्याने ते सर्व तेल साफ करून रस्ता स्वच्छ धुवून शनिवारी दुपारी महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू करण्यात आली.

दुसऱ्या दिवशी शनिवारी तीन वाजण्याच्या सुमारास दोन खासगी वाहनांचा पुन्हा याच ठिकाणी अपघात झाला. या अपघातामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु वाहनांचे नुकसान होऊन वाहतूक कोंडी झाली होती. २२ जानेवारी २०१९ रोजी याच ठिकाणी सीएनजी वाहून नेणाऱ्या ट्रकचा मोठा अपघात होऊन, चालकांचा मृत्यू झाला होता. या पुलावरून सीएनजी, एलपीजी सारखे ज्वलनशील पदार्थ तसेच अतिशय संवेदनशील केमिकल तसेच ज्वालाग्राही पदार्थांची वाहने दररोज जातात. जर अशा एखाद्या मोठ्या वाहनाचा अपघात झाला तर मोठी जीवितहानी होऊ शकते.

या महामार्गाचे काम पाहणाऱ्या तसेच टोल वसूल करणाऱ्या आयआरबी कंपनीकडे स्वत:ची अग्निशमन यंत्रणा नसल्याने अपघात होऊन आग लागल्यानंतर  बोईसर तसेच डहाणू येथून अग्निशमन यंत्रणा मागवावी लागते.

पुलाच्या रचनेत बदल आवश्यक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुलावर उतार असल्याने गुजरातकडून येणारी वाहने  अतिशय वेगात येतात. अपघात होऊ नये यासाठी लावलेले सूचना फलक  आणि सौम्य गतिरोधक वाहनचकांच्या लक्षात येत नाहीत. त्यातच उड्डाणपुलावर आल्यावर ६० ते ७० अंश कोनात तीव्र वळण असल्याने वाहनचालकांचे नियंत्रण सुटून अपघात होतो. गेल्या एक वर्षातच १०० च्या आसपास अपघात होऊन सहा जणांचा मृत्यू झाला तसेच अनेक जण जखमी झाले आहेत. हे अपघात रोखण्यासाठी पुलाच्या रचनेत आयआरबी किंवा राष्ट्रीय महामार्ग प्रशासन यांनी काहीही बदल केले नाहीत, असे वाहनचालकांसह प्रवाशांकडून सांगितले जाते.

या उड्डाणपुलावर वारंवार अपघात होत असतात. त्यामुळे बऱ्याच वाहनचालकांचे मृत्यू या ठिकाणी झाले आहेत. या महामार्गाचा टोल वसूल करणाऱ्या आयआरबी कंपनीने हे अपघात रोखण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढावा व होणारे अपघात कमी करावेत. –  परमेश्वर शेकडे , स्थानिक वाहनचालक