कासा : पालघर जिल्ह्यामध्ये माध्यमिक वर्गाच्या सर्व माध्यमांच्या मिळून ९२७ माध्यमिक शाळा आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंत शिक्षणाची सोय आहे. परंतु आठवीत पास झाल्यानंतर नववीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे शेकडो विद्यार्थी इयत्ता नववी आणि इयत्ता दहावीच्या प्रवेशापासून वंचित राहण्याची भीती आहे.

पालघर जिल्हा हा आदिवासी ग्रामीण जिल्हा आहे. पालघर जिल्ह्यातील लोकवस्ती ही डोंगर-दऱ्यांमध्ये विखुरलेली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी शासनाने प्रत्येक पाडय़ावर प्राथमिक शाळा सुरू केल्या आहेत. परंतु या शाळा साधारणपणे इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या आहेत.

इयत्ता आठवी पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांना नववीच्या प्रवेशासाठी फार मोठी कसरत करावी लागते. माध्यमिक शिक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यामध्ये आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, विनाअनुदानित माध्यमिक शाळा अशा सर्व मिळून ९२७ शाळा आहेत. परंतु या शाळा विद्यार्थ्यांच्या घरापासून १५ ते २५ किलोमीटर अंतरावर आहेत. माध्यमिक शाळा आणि घर यामध्ये १५ ते २५ किलोमीटपर्यंत अंतर असल्याने तसेच विद्यार्थ्यांकडे प्रवसासाठी पैसे नसतात. तर काही ठिकाणी प्रवासाची सोयच नसल्याने दरवर्षी शेकडो विद्यार्थी इयत्ता नववी, इयत्ता दहावीच्या प्रवेशापासून वंचित राहतात. काही विद्यार्थी शाळांमध्ये प्रवेश घेतात. परंतु प्रवासाचे साधन, प्रवासासाठी पैसे नसल्याने पुन्हा शाळेत जात नाहीत. बरेचसे पालक आपल्या पाल्यांना नववी, दहावीत न पाठवता शेतीच्या कामात मदतीसाठी घेतात. काही विद्यार्थी हॉटेल, वीटभट्टी येथे कामाला जातात.  त्यामुळे शेकडो विद्यार्थी प्रवेश घेऊनही शाळाबाह्य होतात. विद्यार्थी शाळाबाह्य होऊ नयेत, जवळच्या शाळेतच त्यांना प्रवेश मिळावा म्हणून माध्यमिक शाळांची संख्या वाढवण्याची मागणी केली जात आहे.

कोणताही विद्यार्थी शाळेबाहेर राहू नये यासाठी शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे वेळोवेळी सर्वेक्षण करून त्यांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणले जाते. अजूनही कुठे असे प्रवेश न मिळालेले विद्यार्थी असतील अशा पालकांनी आमच्याशी संपर्क साधावा. सदर विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेत दाखल करून घेण्यात येईल.  – अशिमा मित्तल, प्रकल्प अधिकारी, डहाणू

माझ्या मुलाच्या नववीच्या प्रवेशासाठी अनेक आश्रमशाळांमध्ये मी फिरलो. परंतु कुठेही निवासी आश्रमशाळेत प्रवेश मिळाला नाही. जवळची मोठी शाळा १५ कि.मी.वर आहे. परंतु प्रवासाची सोय नाही, दररोजचा प्रवास खर्च करणे झेपत नाही. त्यामुळे माझा मुलगा इच्छा असूनही शाळेत जाऊ शकत नाही.

– परशुराम लिलका, पालक