‘पोषण ट्रॅकर’ही निष्प्रभ

कुपोषण संदर्भातील माहिती अद्यावत व ऑनलाइन भरता यावी यासाठी शासनाने दोन वर्षांपूर्वी अंगणवाडी सेविकांना प्रचलित नसलेल्या कंपनीचे भ्रमणध्वनी घेऊन दिले.

निकृष्ट भ्रमणध्वनी, ‘अ‍ॅप’ची इंग्रजी भाषा आणि त्रृटींमुळे अंगणवाडी सेविका हतबल

निखील मेस्त्री
पालघर : अंगणवाडी सेविकांना दोन वर्षांपूर्वी शासनाने दिलेले भ्रमणध्वनी अखेरच्या घटका मोजत असताना कुपोषणबाबतची माहिती भरणारा ‘कॅस’ हा अ‍ॅप बंद करून त्या ऐवजी केंद्र शासनाने लादलेला ‘पोषण ट्रॅकर’ हा अ‍ॅपही सदोष व निष्प्रभ ठरत आहे. त्यातच हे अ‍ॅप इंग्रजीमध्ये असल्यामुळे  अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

कुपोषण संदर्भातील माहिती अद्यावत व ऑनलाइन भरता यावी यासाठी शासनाने दोन वर्षांपूर्वी अंगणवाडी सेविकांना प्रचलित नसलेल्या कंपनीचे भ्रमणध्वनी घेऊन दिले. या भ्रमणध्वनीमध्ये कॅस ( कॉमन अ‍ॅप्लिकेशन सेंटर) नावाच्या अ‍ॅप्सचा वापर करून त्याद्वारे कुपोषणाबाबतची सर्व माहिती भरण्याचे बंधनकारक केले.  अंगणवाडी सेविका व कर्मचारी ही माहिती या अ‍ॅपवर वेळोवेळी भरत असल्या तरी निकृष्ट दर्जाच्या भ्रमणध्वनीमुळे या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.

दिलेला भ्रमणध्वनी नादुरुस्त झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना स्वत:च्या पदरचे पैसे खर्च करून ते दुरुस्त करावे लागत होते.  त्यामुळे  केंद्र शासनाने अगोदरचा तो अ‍ॅप बंद करून पोषण ट्रॅकर हा जाचक अ‍ॅप अमलात आणला.  हा अ‍ॅप मराठी भाषेत नसून तो इंग्रजीत आहे. इंग्रजीतून हा अ‍ॅप समजणे अशक्य असल्याने चुकीची माहिती भरली जाण्याची शक्यताही आहे.  या अ‍ॅपवर माहिती भरण्यास वेळ लागत असल्यामुळे शासनाला कुपोषणासंबंधातील आकडेवारी मिळण्यासही विलंब होणार आहे.  विविध अंगणवाडी कर्मचारी संघटनांनी कृती समितीच्या माध्यमातून  महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांची अलीकडेच भेट घेतली. यावेळी समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ही योजना केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे कृती समितीने त्यांच्याकडे दाद मागावी, असे यावेळी सूचित करण्यात आले. मोबाइल व अ‍ॅप याबाबतच्या आलेल्या सूचना  महाराष्ट्र शासनही  केंद्राला  कळवेल व  दोन्ही सरकारच्या माध्यमातून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगण्यात आले आहे.

पोषण अभियानअंतर्गत रियल टाइम मॉनिटरिंग करण्यासाठी तसेच महिला व बालकल्याण विभागाच्या अनेक योजनांची अंगणवाडीतील कार्यक्षेत्राअंतर्गतची माहिती ऑनलाइन भरण्यासाठी जिल्ह्यतील महिला बालविकास प्रकल्पांतर्गत सुमारे तीन हजार १८३ अंगणवाडी सेविकांना पॅनासोनिक कंपनीचे एलुगा-आय सात प्रकारचे मोबाइल   देण्यात आले आहेत. मात्र यामध्येही  अनेक त्रुटी असल्याचे निदर्शनास येत आहे.   विक्रमगड, वाडा, तलासरी, कासा, जव्हार, मोखाडा अशा ग्रामिणबहुल भागात या मोबाईलला नेटवर्क मिळत नाही. कुटुंब व्यवस्थापन निगडित असलेली माहिती, अंगणवाडीच्या मुलांसोबत सेल्फी काढून ती अपलोड करणे, गृहभेटी दिल्यानंतर त्यासंदर्भातली माहिती, स्तनदा माता, अंगणवाडीच्या बालकांची देखरेख ,वजन, मोजमाप, पोषण आहार आदी विविध माहिती अंगणवाडी सेविकांना या मोबाईलच्या कॉमन एप्लीकेशन सेंटरमध्ये भरावयाची होती.मात्र आता आलेल्या इंग्रजीतल्या ट्रॅकर अ‍ॅप मध्ये ही माहिती भरत असताना अनेक अडचणींचा सामना अंगणवाडी सेविकांना करावा लागत आहे, असे संघटनेचे म्हणणे आहे.

काम करण्याची सक्ती

पोषण ट्रॅकरवर काम करण्यासाठी  अधिकारी वर्ग सक्ती करीत असल्याची तक्रार कर्मचाऱ्यांची आहे. काम न केल्यास मानधन कापू घेऊ, कामावरून काढून टाकू असा इशारा  अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे, असे संघटनेचे म्हणणे आहे.

मोबाइल व्यस्थितरीत्या चालत नसल्याने अनेक अडचणी सेविकांसमोर आहेत. कॅस अ‍ॅप ऐवजी आता इंग्रजीतून आलेले पोषण ट्रॅकर अ‍ॅप न समजणारे आहे. चुकीची माहिती भरली जाण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात कर्मचारी वर्गास याचा मोठा फटका बसत आहे.

– सायली संखे, अंगणवाडी सेविका,दिघे पाडा, मनोर प्रकल्प

कृती समितीच्या मागण्या व अंगणवाडी सेविकांना भेडसावणाऱ्या समस्या लक्षात घेत केंद्रीय महिला बालकल्याण विभागाकडे या समस्या मांडून त्या सोडविण्याकडे जातीने लक्ष देईन व  अंगणवाडी सेविकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतो.

-राजेंद्र गावित, खासदार

अंगणवाडी सेविकांना पुरवण्यात आलेले मोबाइल दर्जाहीन आहेत. इंग्रजीतून नव्याने आलेले पोषण ट्रॅकर अ‍ॅप न समजणारे आहे. हे अ‍ॅप राजभाषेतून असावे. अद्ययावत मोबाइल पुरविण्यात यावेत. अन्यथा १७ ऑगस्ट रोजी मोबाइल वापसी आंदोलनातून कर्मचारी आपले मोबाइल शासनाला परत करतील.

राजेश सिंग, सचिव, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पालघर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Nutrition tracker helpless poor mobile phone english language errors ssh

Next Story
५६ हजार विद्यार्थ्यांना जपण्याचे आव्हानcorona
ताज्या बातम्या