|| नीरज राऊत

त्रुटींमुळे नागरिकांमध्ये संभ्रम

पालघर : पालघर जिल्हा प्रशासनातर्फे करोना संक्रमणाच्या बाबतची माहिती संकलित स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येते. मात्र त्यामध्ये अनेकदा चुका असल्याचे आढळून आले आहे. माहितीमध्ये अनेक त्रुटी असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून  जिल्हा प्रशासन या अहवालाच्या माध्यमातून आपली औपचारिकता पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे, असे दिसून येत  आहे. आरोग्य विभागातील उदासीनता आणि  जिल्ह्यातील आकडेवारीच्या गोंधळामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

जिल्ह्याातील करोनाचे रुग्ण, संशयित रुग्णाची करण्यात आलेली तपासणी, आजारातून पूर्ण बरे झालेल्यांची संख्या, मृत्यू संख्या तसेच उपचाराधीन रुग्णांचा तपशील जिल्हा प्रशासनातर्फे अद्ययावत करून प्रसिद्ध करण्यात येतो. जिल्हा प्रशासनातर्फे नुकतीत एक आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये १ ते १३ जुलै असे सलग अकरा दिवस वसई- विरार महानगरपालिका क्षेत्रात दररोज ७३ रुग्ण वाढ झाल्याचे दर्शवण्यात आले होते. प्रत्यक्षात रुग्णवाढीचे आकडे हे ६४ ते १०१ दरम्यान वेगवेगळे असताना जिल्हा प्रशासनाकडून फक्त कागदी घोडे नाचवण्याचा प्रयत्न केल्याचे यामध्ये दिसून आले आहे. विशेष म्हणजे अशा सदोष अहवालाकडे वरिष्ठांचे देखील दुर्लक्ष झाले आहे.

दुसऱ्या लाटेची शिखर अवस्था असताना जिल्ह्यात शासकीय व खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असत. अशा वेळी अनेक दिवसाच्या अहवालात जिल्ह्याामध्ये किंवा काही विशिष्ट तालुक्यांमध्ये एकही मृत्यूची नोंद करण्यात आली नव्हती. मृत्यूची नोंद केली जात नसल्याने ग्रामीण जिल्ह्याातील नागरिक अचंबित होत असत व याबाबत अनेकदा जिल्हा आरोग्य विभागाकडे विचारणा केल्यानंतर देखील आकडेवारी सुधारण्यासाठी पुरेशा प्रमाणात प्रयत्न झाल्याचे दिसून आले नाही. परिणामी सुमारे गेल्या महिन्यात जिल्ह्याात विविध ठिकाणी खासगी रुग्णालयात तसेच जिल्हा बाहेर झालेल्या तीनशेपेक्षा अधिक मृत्यूच्या नोंदी जिल्हा करोना आकडेवारीत सामावून घेण्यात आल्या.

जिल्हा प्रशासनातर्फे प्रसिद्ध होणारी माहिती तसेच वसई- विरार महानगरपालिकेकडून त्यांच्या क्षेत्रातील रुग्णसंख्या व मृत्यूविषयी दिली जाणारी माहिती यामध्ये अनेकदा तफावत दिसल्याने हा गोंधळाचा विषय राहिला होता. जिल्हा प्रशासन या जिल्ह्याातील दोन आरोग्य विभागांमध्ये समन्वय साधण्यास अपयशी ठरल्याचे दिसून आले आहे.

जिल्ह्यात तिसऱ्या करोना लाटेच्या अनुषंग बालकांमध्ये असणारे आजाराचे प्रमाण अभ्यासले जाणे अपेक्षित होते. मात्र वयोगटानुसार रुग्णांची विगतवारी उपलब्ध करून देण्यास जिल्हा आरोग्य यंत्रणा अपयशी ठरली आहे. त्यामुळे आजाराचा विशिष्ट वयोगटातील नागरिकांवर झालेला परिणाम स्थानिक पातळीवर प्रसिद्ध होऊ शकले नाही.

करोनाच्या नव्याने लादलेल्या निर्बंधांमध्ये टाळेबंदीचा सरसकट जन समुदायावर परिणाम टाळण्यासाठी सूक्ष्म प्रतिबंधात्मक क्षेत्र (मायक्रो कंटेनमेंट झोन) घोषित करणे अपेक्षित आहे. याकरिता झालेली रुग्ण वाढीबाबतची माहिती वॉर्ड निहाय किंवा गाव निहाय प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. संपूर्ण दुसऱ्या लाटेच्या काळात जिल्हा प्रशासन अशी माहिती प्रसिद्ध करण्यास अपयशी ठरली आहे.

करोना विषाणूमध्ये होणारे जनुकीय क्रमानिर्धारण (बदल) व विषाणूचे वेगवेगळे प्रकार आढळल्यास त्याची  माहिती संकलित करणे राज्य शासनाने बंधनकारक केले असताना आरटीपीसीआरचे अत्यल्प प्रमाणात तपासणी करण्याची क्षमता असल्याने जिल्ह्यात इतर जमुकीय माहिती संकलित करण्यास कोणत्याही प्रकारची व्यवस्था जिल्ह्यात झाली नसल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी लसीकरण सत्र आयोजित करताना याची आगाऊ माहिती प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. नीटनेटक्या अशी पद्धती प्रसिद्ध करण्यास जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न तोडके पडले असून काही वेळा तर हस्तलिखित स्वरूपात लसीकरणाबाबत माहिती प्रसिद्ध झाल्याने जिल्ह्यातील आरोग्य विभागाची कार्यक्षमते बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

अनेकदा त्यांच्यावर असलेली जबाबदारी झटकण्याचा सोयीस्कर प्रयत्न केल्याचे आरोप होत आहेत. करोनाकाळात कोट्यवधी रुपयांचा खर्च केला गेला तसेच वैद्यकीय उपचारासाठी ठेका पद्धतीने मनुष्यबळ भरती केली गेली. डॅशबोर्ड व इतर सॉफ्टवेअर निर्मितीसाठी मोठ्या किमतीची ठेके दिले गेले असताना माहिती संकलित करण्यासाठी कंत्राटी पद्धतीचे मनुष्यबळ का उपलब्ध करून घेतले नाही हा प्रश्न निरुत्तरित आहे.

आरोग्य विभागाकडे मनुष्यबळाची मर्यादा असल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही दिवसातील अहवालामधील महानगरपालिका क्षेत्रातील आकडेवारी चुकल्याचे निदर्शनास आले असून या आकडेवारीमध्ये बदल करण्यात येईल. शासनाला पाठविण्यात येणाऱ्या आकडेवारीत रुग्ण वाढसंख्या अचूक आहे. यापुढे सर्व अहवाल तयार करताना अधिक दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  – डॉ. दयानंद सूर्यवंशी,  जिल्हा वैद्यकीय अधिकारी, पालघर