पालघर : शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती करून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य, जिल्हा, विभाग व तालुका पातळीवरील पीक स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस व तीळ या सहा पिकांसाठी रब्बी हंगामात पीक स्पर्धेमध्ये समावेश करण्यात आला असून पीक स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित पिकाखालील किंवा दहा गुंठे सलग क्षेत्रावर लागवड करणे आवश्यक आहे. या स्पर्धेसाठी तालुका हा घटक निश्चित करण्यात आला असून, तालुक्यातील एकूण लागवड क्षेत्र एक हजार हेक्टर किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे.
ही स्पर्धा सर्वसाधारण व आदिवासी शेतकऱ्यांसाठी स्वतंत्ररीत्या आयोजित केले जाणार असून, पीक स्पर्धेसाठी तालुका पातळीवर सर्वसाधारण गटातील किमान दहा स्पर्धक, तर आदिवासी गटातील किमान पाच स्पर्धकांचा सहभाग आवश्यक ठेवण्यात आला आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी ३०० रुपये प्रति शेतकरी प्रति पीक याप्रमाणे प्रवेश शुल्क आकारण्यात येणार असून, तालुका पातळीवरील स्पर्धेच्या निकालावरून पुढे जिल्हा, विभाग व राज्य पातळीवरील बक्षीस जाहीर करण्यात येणार आहे. रब्बी हंगामातील अर्ज दाखल करण्यासाठी ३१ डिसेंबपर्यंत शिक्षेची मुदत घालण्यात आला असून अधिकाधिक शेतकऱ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.