पालघर : ३१ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीत टंकलेखन व तांत्रिक गुंतागुंत झालेल्या चुकांची पडताळणी जिल्हा निवडणूक विभागाने तसेच पालघर, डहाणू व जव्हार नगर परिषदेच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामार्फत पुनर पडताळणी झाल्यानंतर तिन्ही नगरपंचायत क्षेत्रात पुरवणी यादीमध्ये बदल झाल्याचे दिसून आले आहे. जव्हार मध्ये ८३, पालघर मध्ये ७७ तर डहाणूमध्ये ३४ ठिकाणी बदल झाले असून त्यामुळे प्रभागातील मतदार संख्या बदलली आहे. असे असले तरीही निवडणुकीसाठी पात्र असणारी मतदार संख्या पूर्ववत राहिल्याचे निवडणूक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रारूप मतदार यादी त्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदारांच्या तपशिलाबाबत आक्षेप घेण्यासाठी १७ ऑक्टोबर पर्यंतचा अवधी देण्यात आला होता. प्राप्त झालेल्या अर्ज अ व अर्ज ब बाबत सुनावणी घेऊन तसेच नगरपरिषद कर्मचाऱ्यांमार्फत स्थळ पाहणी द्वारे पडताळणी करून अंतिम यादी ३१ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीत देखील काही टंकलेखनाच्या व तांत्रिक बाबीशी निगडित चुका कायम राहिल्याने मतदार यादीतील आक्षेपांबाबत घेतलेल्या निर्णयांच्या प्रत्यक्षात मतदार यादीत प्रतिबिंबित झाले असल्याची खातर जमा केल्यानंतर पुरवणी यादी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये वाडा नगरपंचायत क्षेत्र वगळता जिल्ह्यातील निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या तीनही नगर परिषद क्षेत्रामध्ये बदल झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे प्रभागांमधील मतदार संख्येत काही प्रमाणात बदल झाल्याचे दिसून आले आहे.
प्रारूप यादीच्या तुलनेत पालघर मध्ये मोठे बदल
पुरवणी यादी दरम्यान पालघर नगरपरिषद क्षेत्रात ७७ ठिकाणी बदल झाल्याचे निश्चित करण्यात आले असून प्रभाग क्रमांक १४ मध्ये ४७ मतदारांची व प्रभाग क्रमांक ९ मध्ये १३ ने वाढ झाली आहे. तर प्रभाग क्रमांक ८ मध्ये २८ मतदार कमी झाल्याचे दिसून आले आहे. प्रारूप मतदार यादीच्या तुलनेत प्रभाग क्रमांक ९ मध्ये तब्बल ६०६ मतदारांची संख्या वाढली असून त्याचबरोबरनी प्रभाग १२ मध्ये २००, प्रभाग ४ मध्ये १३५, प्रभाग २ मध्ये १०४, व प्रभाग १४ मध्ये ९१ मतदार वाढले आहेत. तर प्रभाग क्रमांक ८ मध्ये ३९१ मतदार संख्या कमी झाली असून प्रभाग ११ मध्ये १९८, प्रभाग १३ मध्ये १७६, प्रभाग १० मध्ये १४५, प्रभाग ३ मध्ये १४१ व प्रभाग ५ मध्ये १०७ मतदार कमी झाल्याचे दिसून आले आहे.
खर्चाची मर्यादा
जिल्ह्यातील पालघर व डहाणू या दोन नगरपरिषदा ब वर्गात येत असून या निवडणूक क्षेत्रातील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी ११.२५ लक्ष तर प्रभागातील उमेदवारासाठी साडेतीन लाख रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. जव्हार नगरपरिषद क वर्गात येत असल्याने जव्हार येथील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी साडेसात लाख रुपये व उमेदवारांसाठी अडीच लाख रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. वाडा नगरपंचायत क्षेत्रातील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसाठी सहा लाख तर उमेदवारांसाठी सव्वा दोन लाख रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आले असून उमेदवारी दाखल करणाऱ्या सर्व उमेदवारांनी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात खर्च जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या संदर्भात सूचना संबंधित नगरपरिषद नगरपंचायतीने प्रसिद्ध केले असून त्याचे अनुपालन करण्याच्या सूचना उमेदवारांना दिल्या आहेत. पालघर नगर परिषदेच्या पुरवणी यादीनंतर अंतिम मतदार यादी स्वतंत्रपणे पाठवली आहे.
| प्रभाग क्रमांक | पुरवणीयादीनंतर मतदार संख्या |
| १ | २८५० |
| २ | ४३१९ |
| ३ | ३५५८ |
| ४ | २९१९ |
| ५ | ४११७ |
| ६ | ४४३२ |
| ७ | ३२२८ |
| ८ | ५२३६ |
| ९ | ४३७० |
| १० | ३९१० |
| ११ | ३९७७ |
| १२ | १५५३ |
| १३ | ३९९२ |
| १४ | ४२६६ |
| १५ | ३०१३ |
| एकूण | ५५७२७ |
