क्षयरोग तपासणी असमाधानकारक

औषध प्रतिबंध क्षयरोगाचे निदान करण्यासाठी विशेष थुंकी पृथक्करण करणारी चार अद्ययावत यंत्र जिल्ह्याकडे प्राप्त आहे.

केंद्र सरकारच्या पथकाकडून जिल्ह्य़ाचा पाहणी दौरा; विशेष कार्यक्रम राबविण्याची सूचना

पालघर : देशातील क्षयरोग तपासणीमध्ये पालघर जिल्ह्याची कामगिरी असमाधानकारक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील क्षयरोग तपासणी क्षमता वाढविणे व रुग्णांच्या उपचाराकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी विशेष कार्यक्रम राबवण्यात यावा, असे केंद्र सरकारच्या पथकाने सूचित केले आहे.  देशातील क्षयरोग तपासणी व उपचाराच्या दृष्टीने चांगली कामगिरी तसेच असमाधानकारक कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांचा डॉ. शुभदा शेनोय यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या पथकाने  पालघर जिल्ह्य़ाचा पाहणी दौरा केला. त्याअंतर्गत या पथकाने जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. त्या वेळी जिल्ह्यातील क्षयरोग तपासणीची कामगिरी उंचावण्यासाठी पथकाने विविध उपाययोजना सुचवल्या.

पालघर जिल्ह्यात क्षयरोग झालेल्या रुग्णांच्या तपासणीची टक्केवारी तसेच त्याबाबत केंद्र व राज्य शासनाला सूचित करण्याचे प्रमाण अवघे ३३ टक्के आहे. देशातील विविध जिल्ह्यांच्या कामगिरीच्या तुलनेत पालघर जिल्ह्याची कामगिरी अत्यंत सुमार असल्याने त्यामुळे सुचविलेल्या सुधारणा तातडीने अंमल करण्याचे नमूद केले.

क्षय रुग्णांचा शोध घेण्यासाठी तपासणीचे प्रमाण वाढवणे, खासगी डॉक्टरांकडे उपचार घेणाऱ्या क्षय रुग्णांची माहिती संकलित करून त्याबाबत पाठपुरावा करणे तसेच रुग्ण नियमितपणे औषधोपचार घेत आहेत का याची खातरजमा करणे अशी आखणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील क्षयरोग तपासणीकरिता पायाभूत सुविधांचा स्तर उंचावणे, पूर्णवेळ जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्यांची नेमणूक करणे, क्षयरोग असणाऱ्या रुग्णांना औषध देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणे तसेच औषध प्रतिबंधक क्षयरोगाची तपासणी करण्यासाठीचा आराखडा तयार करणे आदी कामांचाही त्यात समावेश आहे.

त्रिसूत्री कार्यक्रम

औषध प्रतिबंध क्षयरोगाचे निदान करण्यासाठी विशेष थुंकी पृथक्करण करणारी चार अद्ययावत यंत्र जिल्ह्याकडे प्राप्त आहे. त्याचा अधिकाधिक वापर करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्यासाठी आशा सेविकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. क्षय रुग्णाचा शोध, तपासणी व उपचार या त्रिसूत्री कार्यक्रमासाठी जिल्हा आरोग्य विभाग विशेष मोहीम हाती घेणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

क्षयरोग                    तपासणी

* बोईसर ग्रामीण रुग्णालय       १४ टक्के

* तलासरी ग्रामीण रुग्णालय      १७ टक्के

* विक्रमगड                 २२ टक्के

* जव्हार                   २६ टक्के

* मोखाडा                 ३४ टक्के

* डहाणू                    ३७ टक्के

* वाडा ग्रामीण रुग्णालय       ३९ टक्के

* वसई ग्रामीण             ४६ टक्के

* पालघर                  ५४ टक्के

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पालघर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Palghar district s performance in tuberculosis screening is unsatisfactory zws

Next Story
पालघर शहरात उद्योगांमुळे जलप्रदूषण
ताज्या बातम्या