पालघर : सन २०२७ पर्यंत ‘कुष्ठरोगाचा शून्य प्रसार’ हे लक्ष्य गाठण्यासाठी पालघर जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून यासाठी १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत कुष्ठरुग्ण शोधमोहीम राबविण्यात येणार असून तयारीचा आढावा घेण्यासाठी कुष्ठरोग शोधमोहीम समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.
या बैठकीत सहायक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. संदीप निंबाळकर यांनी जिल्ह्यातील राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाचा आढावा घेत सविस्तर माहिती सादर केली. आगामी शोधमोहीमेचे स्वरूप, मैदानातील स्थिती आणि आवश्यक नियोजन समितीसमोर मांडण्यात आले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी यांनी “कुष्ठरुग्णांचे लवकर निदान आणि उपचार ही आजच्या घडीची सर्वात मोठी गरज आहे. सर्व विभागांनी तसेच जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे. समाजातून कुष्ठरोग निर्मूलनासाठी एकत्रितपणे प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे,” असे आवाहन केले. ते पुढे म्हणाले, “व्यापक जनजागृतीद्वारे संसर्गाची साखळी खंडित केल्यास २०२७चे लक्ष्य साध्य होऊ शकते.”
बैठकीस सहाय्यक संचालक, मलेरिया (ठाणे विभाग) डॉ. सोनवणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामदास मरड, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळुंखे यांसह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
“या अभियानांतर्गत आरोग्य पथके घराघरांत भेट देऊन संभाव्य कुष्ठरुग्णांची ओळख पटवणार आहेत. लक्षणे आढळल्यास संबंधित व्यक्तींना तात्काळ तपासणी व उपचार प्रक्रिया उपलब्ध करून द्यावी, नागरिकांनी भीती न बाळगता तपासणीस सहकार्य करावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी केले आहे.
खालील पद्धतीने राबविले जाणार अभियान
* ग्रामीण भागातील १०० टक्के लोकसंख्येची प्रत्यक्ष तपासणी
* शहरी भागातील ३० टक्के ‘जोखीमग्रस्त’ लोकांचे सर्वेक्षण
* यासाठी आशा सेविका, आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवक घराघरांत जाऊन तपासणी करतील. * संभाव्य रुग्णांची तत्काळ नोंद, तपासणी व उपचाराची प्रक्रिया सुरु केली जाईल.
