मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर खाद्यतेल (गोड तेल) घेऊन जाणारा टँकरचा तवा व सोमटा या पालघर तालुक्यातील गावाजवळ अपघात झाला आहे. अपघातानंतर टँकरमधून तेल गळती सुरू झाल्यानंतर तेल गोळा करुन घेऊन जाण्यासाठी गावकऱ्यांच्या झुंबड उडाली आहे.

दोन दिवसांपूर्वी द्रव्य रूपातील अमोनिया टँकरचा अपघात घडला त्यापासून काही अंतरावर गुजरातकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर खाद्यतेल घेऊन जाणाऱ्या या ट्रकचा अपघात घडला आहे. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास टँकर उलटल्यानंतर त्यामधून तेल गळती सुरू झाली असून तेल रस्त्यालागत खड्ड्यामध्ये गोळा होत आहे. गळती होणारे तेल गोळा करण्यासाठी लगतच्या भागातील रहिवाशांनी घरातील भांडीकुंडी, हांडे, कॅन घेऊन अपघातग्रस्त ठिकाणे दाखल झाले आहेत.

राष्ट्रीय महामार्गावर चारोटी ते चिल्हार फाटा या पट्ट्यादरम्यान अनेक धोकादायक वळणे व ब्लँक स्पॉट असून या ठिकाणी अनेकदा अपघात घडत असून धोकादायक वळणं कमी करण्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अपयशी ठरले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशाप्रकारच्या अपघातात झालेला ११० जणांचा मृत्यू
१९९१ साली मेंढवण खिंडीत अशाच एका अपघातग्रस्त टँकरमधून केरोसीन समजून अती ज्वलनशील रसायन गोळा करताना झालेल्या स्फोटामध्ये ११० स्थानिक होरपळून मृत्युमुखी पडले होते. महामार्गावर अपघात झाल्यानंतर चोरीच्या उद्देशाने किंवा विनामूल्य मिळणाऱ्या वस्तूंचा हव्यासापोटी आपला जीव धोक्यात घालून स्थानिक मंडळी अशा प्रकारे कृत्य करत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे.