कासा  :  मोखाडा तालुक्यातील पायरवाडीतील एका सहा वर्षीय मुलाचा जव्हारमधील कुटीर रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. रुग्णवाहिकेचे भाडे देण्यासाठी पैसे नसल्यामुळे मृतदेह दुचाकीवरून नेण्याची वेळ त्याच्या पालकांवर आली. त्यामुळे परिसरात सरकारी यंत्रणेविषयी संताप व्यक्त केला जात आहे.    

मोखाडा तालुक्यातील पायरवाडी या गावामधील अजय युवराज पारधी या मुलाला दोन दिवसांपूर्वी ताप आला होता. त्याच्या आईवडिलांनी त्याला उपचारासाठी त्र्यंबकेश्वर येथे नेले, परंतु तिथे एक दिवस खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर तेथील डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याला मोखाडा येथील सरकारी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

अजयची प्रकृती जास्तच गंभीर असल्याने मोखाडा येथील डॉक्टरांनी त्याला जव्हार येथील कुटीर रुग्णालयात दाखल करायला सांगितले. अजयच्या आईवडिलांनी त्याला तात्काळ कुटीर रुग्णालयात दाखल केले. परंतु २५ जानेवारीला रात्री ९ च्या सुमारास उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

अजयच्या वडिलांकडे असलेले सर्व पैसे या धावपळीत खर्च होऊन गेले होते. त्यामुळे अजयचा मृतदेह घरी कसा न्यायचा, हा प्रश्न उपस्थित झाला. त्यांनी रुग्णवाहिकाचालकाकडे चौकशी केली असता भाडे देणार असेल तरच रुग्णवाहिका मिळेल असे चालकाकडून सांगण्यात आले. परंतु जवळ पैसे नसल्याने अजयच्या कुटुंबीयांना मुलाचा मृतदेह दुचाकीवरून नेण्याची वेळ आली.

रात्री कुडकुडत्या थंडीत मृतदेह दुचाकीवरून त्यांना घेऊन जावा लागला. त्यामुळे परिसरातून सरकारी यंत्रणेविषयी संताप व्यक्त केला जात असून संबंधित प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

कुटीर रुग्णालयात बाळाला दाखल केले तेव्हा त्याची प्रकृती अतिशय बिकट होती, अशा अवस्थेत ते बाळाला घरी घेऊन जाण्याची घाई करीत होते. उपस्थित डॉक्टरांनी त्यांना रोखले, अखेर काही वेळातच बाळाचा मृत्यू झाला. दरम्यान, रुग्णालयात रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. दरम्यान एका खासगी रुग्णवाहिकेसाठी त्याच्या मालकाने पैशांची मागणी केली होती. आम्ही पर्यायी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली मात्र रुग्णवाहिका येण्याअगोदरच कुटुंबीय मृतदेह घेऊन निघून गेले. 

डॉ. रामदास मराड, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, जव्हार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.