पालघर : पालघर तालुक्यात केळवा व सफाळे परिसरात पिकणारा शेतमाल मुंबईच्या बाजारात घेऊन जाण्यासाठी रेल्वे गाडय़ा उपलब्ध नसल्याने हा शेतमाल पहाटे चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकलमधून नेला जातो. या गाडय़ांमध्ये आधीच गर्दी होत असल्याने त्यातच भाजी विक्रेत्यांच्या शिरकावाने प्रवासी मेटाकुटीला येत असून यामधून त्यांचे आणि भाजीपाला विक्रेत्यांमध्ये अनेकदा वाद-विवाद, भांडणे प्रसंगी हाणामारीचे प्रकारही घडत आहेत.
डहाणू व पालघर तालुक्यात मोठय़ा प्रमाणात भाजीपाला पिकत असून त्यासह सफाळे भागातील दूध विरार- वसई, भाईंदर तसेच मुंबई उपनगरात दररोज नेले जाते. पूर्वी या शेतमालाची वाहतूक वीरमगाम पॅसेंजर तसेच लोकशक्ती एक्सप्रेसमधून केली जात असे. करोनाकाळात बंद केलेली वीरमगाम पॅसेंजर अजूनही पूर्ववत केली नसून लोकशक्ती एक्सप्रेसचा सफाळा थांबा डिसेंबर २०२१ पासून काढून टाकण्यात आला आहे. परिणामी, या भागातील सर्व शेतमाल ४.४० वाजता डहाणू रोड येथून सुटणाऱ्या चर्चगेट लोकलमधून नेला जात आहे. भाजीपाल्याची वाहतूक करणाऱ्या महिलांना माल डब्यात जागा कमी असल्याने सामान्य डब्यांमध्ये हा शेतमाल चढविण्यात येतो. भाज्यांच्या पाटय़ा, टोपल्या लोकलच्या दारातच ठेवल्या जातात. पुढे लोकलमध्ये चढणाऱ्या प्रवाशांना त्याचा अडथळा होत असतो. अनेकदा वादविवादाचे प्रसंग होऊन हाणामारीपर्यंत प्रकार होत असल्याचे प्रवाशांकडून सांगितले जाते. शेत मालाची वाहतूक करण्यासाठी पॅसेंजर गाडी पूर्ववत सुरू होत नसल्यास या वेळेत आणखी काही उपनगरीय गाडय़ा सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून पुढे येत आहे.
प्रथम वर्गाच्या डब्यात सामान्य प्रवासी
डहाणू रोड-विरार भागात असणाऱ्या प्रवासी संख्येच्या तुलनेत गाडय़ांची उपलब्धता कमी असल्याने जवळपास सर्वच गाडय़ा भरभरून जात असतात. त्यामुळे अनेकदा सर्वसामान्य डब्यांमध्ये चढणे शक्य होत नसल्याने काही प्रवासी किंवा विनातिकीट नागरिक प्रथम वर्गाच्या डब्यातून प्रवास करताना दिसून येत आहे. त्याविरुद्ध प्रथम दर्जातील प्रवासाने विविध पातळीवर तक्रारी केल्या असल्या तरीसुद्धा त्यांना गैरसोयीचा सामोरे जावे लागत असल्याचे सांगण्यात येते.
संग्रहित लेख, दिनांक 14th May 2022 रोजी प्रकाशित
शेतमाल वाहतुकीमुळे प्रवाशांचा संताप ; गर्दी असलेल्या डहाणू रोड-चर्चगेट लोकलमध्ये भाजीपाला विक्रेत्यांचा शिरकाव
पालघर तालुक्यात केळवा व सफाळे परिसरात पिकणारा शेतमाल मुंबईच्या बाजारात घेऊन जाण्यासाठी रेल्वे गाडय़ा उपलब्ध नसल्याने हा शेतमाल पहाटे चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकलमधून नेला जातो.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 14-05-2022 at 00:08 IST
Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Passenger resentment farm transport vegetable vendors infiltrate crowded dahanu road churchgate local amy