पालघर: पश्चिम रेल्वेने १ ऑक्टोबरपासून जारी होणाऱ्या उपनगरीय सेवांचा तपशील जाहीर केला असून विरार ते डहाणू रोड दरम्यान प्रवाशांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने  प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे विरार पलीकडे उपनगरीय सेवेत वाढ झाली नसून काही गाडय़ांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत.

पश्चिम रेल्वेने नवीन वेळापत्रकात होणाऱ्या बदलांचा घोषवारा जाहीर केला असून यामध्ये करोना काळात सकाळी ४.४० वाजता चर्चगेटकडे धावणारी विशेष सेवा नियमित वेळापत्रकात अंतर्भूत करण्यात आली आहे. उपनगरीय क्षेत्रात सात अप (मुंबईच्या दिशेने) सेवा व पाच सेवा डाऊन (मुंबईकडून) वाढविण्यात आल्या असल्या तरीही विरार पलीकडच्या उपनगरीय सेवेमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. करोना काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी डहाणू रोड येथून पहाटे गाडी सुरू करताना सकाळी ७.०५ वाजता कोविडपूर्व काळात डहाणू रोड येथून सुटणाऱ्या लोकलचा रेक वापरण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी याच सुमारास नवीन गाडी सुरू करण्याबाबतचे पश्चिम रेल्वेने लोकप्रतिनिधी, विभागीय समितीचे सदस्य तसेच प्रवासी संघटनेला दिलेले आश्वासन फोल ठरले आहे.

Chalisgaon, railway trains canceled,
चाळीसगावमधील कामामुळे तीन दिवस काही रेल्वे गाड्या रद्द
Change in train schedule due to night block at Vikhroli
विक्रोळीतील रात्रकालीन ब्लॉकमुळे रेल्वेच्या वेळापत्रकात बदल
Mumbai to Pune share cab fares
मुंबई ते पुणे, नाशिक आणि शिर्डी शेअर कॅबच्या भाड्यात वाढ होणार
Railway megablock
रेल्वेचा पुन्हा मेगाब्लॉक! जाणून घ्या कोणत्या गाड्या रद्द अन् कोणत्या उशिरा धावणार…

विरार येथून सायंकाळी ४.१० वाजता डहाणू रोडकडे सुटणारी सेवा तांत्रिकीकरणाचा आधार घेऊन रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी रात्री ९.२० वाजता विरार ते डहाणू रोड दरम्यान अतिरिक्त सेवा देण्यात आली आहे. डहाणू रोड येथून २.१५ वाजता दादपर्यंत जाणारी उपनगरीय सेवा चर्चगेटपर्यंत विस्तारित करण्यात आली आहे. करोनापूर्व काळात सकाळी ९.१० वाजता विरार येथून डहाणू रोडकडे जाणाऱ्या सेवा त्याच वेळेच्या जवळपास चर्चगेट येथून निश्चित करण्यात आली आहे.

लांब पल्ल्याच्या गाडय़ांचे थांबे सफाळा स्थानकात कमी करण्यात आले असून उपनगरीय क्षेत्रात नव्याने सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी प्रलंबित होती. मात्र सकाळी व सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळेत विशेष कोणतीही सेवा उपलब्ध न करून दिल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे.

टाळेबंदी काळात रद्द असलेली डहाणूवरून सुटणारी सकाळी ७:०५ ची लोकल पश्चिम रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी पालघर भेटीदरम्यान आश्वासन देऊनही सुरू करण्यात आली नाही. डहाणू ते वैतरणा विभागाला सापत्नतेची वागणूक मिळाली आहे. वेळापत्रकाची अंमलबजावणी करताना आणखी काय बदल होतात त्यातून डहाणू ते वैतरणा पट्टय़ातील बुडत्या प्रवाशांना काडीचा आधार तरी मिळेल का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. तूर्तास पश्चिम रेल्वेने केलेल्या वेळापत्रक बदलात डहाणू ते वैतरणा पट्टय़ातील प्रवाशांची घोर निराशा झाली आहे.

हितेश सावे, जनसंपर्क अधिकारी, डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था