पशुधन पर्यवेक्षकांच्या राज्यव्यापी असहकार आंदोलनाचा जिल्ह्याला फटका

नीरज राऊत
पालघर : पशुवैद्यकीय पदविकाधारकांना पशुधनावर औषधोपचार करण्याचे तसेच औषध बाळगणे व औषध लिहून देण्यास निर्बंधित केल्याने पशुधन पर्यवेक्षक आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. त्याचा फटका जिल्ह्यतील पशुपालकांना होत असून दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन व शेळीपालन व्यवसाय संकटात आला आहे.

महाराष्ट्र पशुवैद्यक परिषद कायदा हा सन १९७१ पासून अमलात आणला गेला असून १९८१ मध्ये पशुवैद्यकीय पदविकाधारकांची नोंदणी करण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार अनेक पदविकाधारक शासकीय सेवेत श्रेणी-२ मध्ये तसेच खासगी दवाखान्याद्वारे स्वतंत्रपणे औषधोपचार करीत आहेत. राज्य शासनाने भारतीय पशुवैद्यक परिषद कायदा १९८४ ची अंमलबजावणी १९९७ पासून सुरू केली. त्यानुसार नोंदणीकृत पशुवैद्यकांनाच औषधोपचार करण्याची मुभा देण्यात आली आहे. हे प्रकरण काही काळ न्यायप्रविष्ट होते.  सरकारने ऑगस्ट २००९ मध्ये पदविकाधारकांना नोंदणीकृत पशुवैद्यक यांच्या देखरेखीखाली २२ कामे करण्याची मुभा दिली आहेत. पदवीधर व नोंदणीकृत पशुवैद्यक अनेकदा शहरी भागात किंवा आपल्या मुख्यालयाच्या ठिकाणी न राहता दूरवर निवास करीत असल्याने अशा पशुवैद्यकांकडून प्रत्यक्ष आजारी पशूचे निरीक्षण न करता भ्रमणध्वनीवरून संवाद साधून औषधोपचाराच्या सूचना देण्यास पदविकाधारक पशुवैद्यकानी विरोध दर्शवला आहे. १५ जूनपासून  संघटनेतर्फे असहकार आंदोलन सुरू करण्यात आले होते.  नंतर १६ जुलैपासून कायद्याप्रमाणे काम करण्याचे आंदोलन  छेडले आहे. परिणामी  जिल्ह्यच्या ग्रामीण भागात असलेल्या दुग्ध व्यावसायिक, शेळी पालन व कुक्कुटपालन केंद्रावर पूर्वी उपचार करणारे पशुधन पर्यवेक्षकांनी सेवा देण्यास नकार दिला आहे. पालघर जिल्हा नोंदणीकृत पशुवैद्यक यांची संख्या कमी असून जिल्ह्यतील ३४ पदविकाधारक पशुवैद्यक पर्यवेक्षकांनी असहकार आंदोलन छेडल्याने जिल्ह्यातील पशुपालक चिंतेत आहेत.

मुक्या प्राण्यांची भ्रमणध्वनीद्वारे कसे करणार निदान?

  •  भ्रमणध्वनीवरून  दूरवर असलेल्या नोंदणीकृत पशुवैद्यकांना या मुक्या प्राण्यांच्या वेदना काय समजणार? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांंपासून ग्रामीण व दुर्गम भागात सेवा देणाऱ्या पदविकाधारक पशुवैद्यकाने उपचार करण्याची मुभा द्यावी अशी मागणी पशुपालकांकडून करण्यात येत आहे.
  • जुने सेवा प्रवेश नियम ८५ – १५ असे असल्यामुळे पदविकाधारकांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध होती.  नियमात सुधारणा करून तो ९५- ५ असा करावा असा प्रस्ताव सादर केल्यामुळे पदविकाधारकांच्या पदोन्नती अडचणीत येवू शकतात.  विविध १० मागण्यांसाठी पदविकाधारक  आंदोलन करीत आहेत.

पशुवैद्यक दवाखाने

  • एकून श्रेणी -१ चे दवाखाने: ४१
  • एकून श्रेणी – २ चे दवाखाने: ४४
  • मिनी पॉली क्लिनिक: ३
  • जिल्हा सर्व चिकित्सालय: १
  • नोंदणीकृत पशुवैद्यक: २५
  • बिगर नोंदणीकृत पशुवैद्यक पदविकाधारक: ३४

जिल्ह्यातील पशुधन १९ व्या गणनेनुसार

जनावरे: ३४१८०४

शेळ्या: १३१०००

कोंबडय़ा: ८६३६४७