कासा : आदिवासींना पाडय़ात जायला चांगले रस्ते नसताना तेथे ते बनवणे गरजेचे असताना काँक्रीटच्या पक्क्या रस्त्यांवरच पुन्हा काँक्रीट चढवून रस्ते तयार करण्याचा प्रकार तलासरीत घडत आहे. नगरपंचायत ठेकेदारांच्या फायद्यासाठी अशी मनमानी कामे करून निधीचा गैरवापर करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

तलासरी येथील केकेनगरमध्ये जाण्यासाठी बाजारपेठेतून चांगल्या दर्जाचा सार्वजनिक बांधकाम विभागाने बनविलेला काँक्रीट रस्ता असताना ठेकेदाराच्या फायद्यासाठी त्या चांगल्या रस्त्यावरच पुन्हा काँक्रीट करण्यात आले आहे. केकेनगरमध्ये जाण्यासाठी राजपूत मॉल बाजूनेही जाण्यासाठी काँक्रीट रस्ता आहे.  त्या रस्त्याची मात्र दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावर काँक्रीट रस्ता बनविणे गरजेचे असताना तेथे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत शिवसेनेचे नगरसेवक आशीर्वाद रिंजड हे नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार दाखल करणार आहेत.

तलासरी नगर पंचायतमार्फत अनेक रस्त्यांची कामे करण्यात येत आहेत. पण ही कामे मुदत संपली तरी अजून अर्धवट आहेत. याबाबत ठेकेदारावर कोणतीही कारवाई न करता नगर पंचायत ठेकेदारांची देयके काढण्याची घाई अधिकाऱ्यांना झाली असल्याने यात गौडबंगाल काय, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. याबाबत तलासरी मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया मिळाली नाही.