कासा : कासा ग्रुप ग्रामपंचायतीने पाठपुरावा करून महाराष्ट्र ग्रामीण पेय जल योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर केली. मात्र तीन वर्षांपूर्वी भूमिपूजन झालेल्या या योजनेतील नळजोडणी मात्र रखडली आहे.पंतप्रधान जलजीवन योजनेअंतर्गत पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी कासा येथील या योजनेचे तीन वर्षांपूर्वी भूमिपूजन केले होते. या पाणीपुरवठा योजनेवर ३ करोड ७८ लाख खर्च करून, यात पूर्वी बांधलेली जुनी विहीर दुरुस्ती करून वापरण्यात आली आहे. त्याचबरोबर दीड एमएलडी फिल्टरेशन, पंप, नवीन तंत्रज्ञान वापरून ही ग्रामीण पेय जल योजना बांधून पूर्ण झाली
आहे.
फिल्टर चेंबर, जुनी विहीर सुधारणा करून डोंगरी पाडा येथे उंचावर पाण्याची टाकी बांधून झाली आहे. गावात अनेक पाडय़ात मुख्य पाइपलाइन टाकून झाली आहे. वीज कनेक्शन, पाणी याची चाचणी झाली असूनही नागरिकांना घरगुती नळजोडणी देण्याच्या कामाची कासवगती आहे. पावसाळय़ाच्या आधी आपल्या घरात नळ येईल, या आशेवर असलेल्या ग्रामस्थांची त्यामुळे निराशा होत आहे. आता संपूर्ण पाणी योजना कार्यान्वित होण्यासाठी किती काळ लागेल हे सांगता येत नाही. अनेक ग्रामस्थांनी नळासाठी ग्रामपंचायतीमध्ये डिपॉझिट भरले आहे. ते सध्या नळजोडणीची वाट बघत आहेत.
या योजनेचे सर्व काम पूर्ण झाले असून नळजोडणी देण्यास संथ गतीने सुरुवात झाली आहे. ३००च्या आसपास नागरिकांची नळजोडणी झाली असून अजून शेकडो ग्रामस्थ नळजोडणीसाठी अनामत रक्कम भरून वाट बघत आहेत.
ग्रामपंचायतीची निवडणूक झाली नसल्याने प्रशासक सध्या काम पाहत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजना थंडावली आहे, असे म्हटले जात आहे. मोठा पाऊस सुरू झाल्यावर नळजोडणीस त्रास होऊ शकतो. त्यामुळे जास्त कामगार लावून नळजोडण्या कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून ही पाणीपुरवठा योजना तयार असून, अनेक ग्रामस्थांनी घरगुती नळजोडणीसाठी डिपॉझिट भरले आहे. पुढे काही दिवसांत पावसाळा येणार आहे, नंतर पुन्हा नळजोडण्या करण्यासाठी त्रास होऊ शकतो म्हणून लवकरात लवकर नागरिकांना घरगुती नळपुरवठा जोडण्या कराव्यात. -राजकुमार गिरी, माजी ग्रामपंचायत सदस्य, कासा.